सीएम शिंदेंचं ठरलं, ‘हॉटसीट’वर कधी बसायचं!

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

सीएम शिंदेंचं ठरलं, ‘हॉटसीट’वर कधी बसायचं!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई- राजकीय नेते, बॉलिवूडचे स्टार, आणि मोठे उद्योगपती आपल्या आयुष्यात महत्वपूर्ण गोष्टी करताना सर्वोत्तम मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करत असतात. मंगल मुहूर्ताच्या बाबतीत राजकीय नेते आघाडीवर असतात. मंगलमुहूर्तावर एखादी चांगली गोष्ट सुरू केली की मिळणारं यशंही नेत्रदिपक असतं असं राजकीय नेत्यांना वाटतं. आणि त्यातही ती राजकीय व्यक्ती जर मुख्यमंत्री असेल तर विचारूच नका. त्यामुळेच ५० आमदारांचे समर्थन मिळवून सत्ता उलथवण्याचा  धाडसी प्रयोग करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असाच एक दिवस आणि मुहूर्त मंत्रालयातील आपल्या दालनात स्थानापन्न होण्यासाठी काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात प्रवेश करून राज्यातील सगळ्यात पॉवरफुल खुर्चीवर बसण्याचा क्षण अनुभवण्यासाठी गुरुवारचीच निवड केली आहे.
     संपूर्ण राज्याचा प्रशासकीय कारभार ज्या वास्तूतून हाकला जातो ते मंत्रालय  चर्चगेट या परिसरात आहे. या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर राज्यातील सगळ्यात पॉवरफुल  दालन आहे. या दालनात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर स्थानापन्न होण्यासाठी राज्यातील सगळ्याच पक्षांचे नेते दिवस-रात्र झटत असतात. २० जून रोजी शिवसेनेतल्या अस्वस्थ आमदारांना घेऊन उठाव केल्यानंतर आज पर्यंत देशाच्या इतिहासात झालं नाही असं बंड शिंदे यांनी केले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीतून पायउतार व्हावे लागले. त्याच खुर्चीत आता एकनाथ शिंदे स्थानापन्न होणार आहेत. याच खुर्चीतून ते राज्याचा कारभार चालवणार आहेत. राज्यातील जनतेला ‘आपलं सरकार’ वाटावं यासाठी काम करण्याचा शिंदेंचा मानस आहे. त्यामुळे यासाठीचा मुहूर्तही तितकाच योग्य असावा याकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महादेवाचे निस्सीम भक्त आहेत. त्याचप्रमाणे ते शिर्डीच्या साईबाबांचे आणि दत्तगुरूंचेही उपासक आहेत. दररोज न चुकता विधिवत पूजाअर्चा करणारे मुख्यमंत्री शिंदे हे दासबोधाचे उपासक आहेत. समर्थांच्या बैठकीत सहभागी होणारे राज्यातील पावरफुल नेते असलेले शिंदे हे पद्मविभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिष्य आहेत. आध्यात्मिक संस्कारात लहानाचे मोठे झालेले शिंदे हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी शक्यतो गुरुवारची निवड करतात. त्यामुळेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात असलेल्या खुर्चीवर स्थानापन्न होण्यासाठी शिंदे यांनी गुरुवारी ७ जुलै या दिवसाची निवड केलेली आहे. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री सहाव्या मजल्यावरील दालनात असलेल्या सगळ्यात ‘हॉट चेअर’वर स्थानापन्न होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आपल्या दालनात स्थानापन्न होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  त्याचप्रमाणे भाजपचे राज्यातील बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उठाव करणारे ५० आमदार उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे राज्य प्रशासनातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत.
Exit mobile version