राणा आणि बच्चू कडू यांच्या मुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये संघर्ष

राणा आणि बच्चू कडू यांच्या मुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये संघर्ष

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड झालं. त्यानंतर दोन्ही गटामध्ये मोठा संघर्ष सुरु असल्याचं दिसून येत आहे. भाजपशी सातत्याने सलगी करू पाहणारे अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्षामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ‘यादवी’ युद्ध रंगण्याची शक्यता आहे. रवी राणा यांनी रविवारी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आशयाचे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. या वक्तव्यावर बच्चू कडू (Bacchu Kadu) चांगलेच संतापले होते. रवी राणांच्या (Ravi Rana) टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्ये खेचले. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले आहे. यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या बंड हे पैसे आणि सत्तेच्या हव्यासापायी झाले होते, असा संदेश सामान्य जनतेमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे बच्चू कडू यांच्याप्रमाणे शिंदे गटातील आमदारही रवी राणांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तसे झाल्यास शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच बच्चू कडू यांच्या या आव्हानामुळे शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ‘५० खोके, एकदम ओक्के’ची घोषणा देत बंडखोर आमदारांना जेरीस आणले होते. पावसाळी अधिवेशनात या घोषणेवरून रणकंदन झाले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) इतर नेत्यांकडून अधुनमधून खोक्यांचा उल्लेख होत असला तरी ‘५० खोके, एकदम ओक्के’ या वाक्याचा अनेकांना विसर पडला होता. परंतु, आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादामुळे खोक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. परिणामी या मुद्द्यावरुन शिंदे गटावर पुन्हा एकदा दोषारोप करण्याची संधी विरोधकांकडे चालून आली आहे.

बंडखोर आमदारांना खोके मिळाल्याचा आरोप दुसरा तिसरा कोणी केला नसून भाजपशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांनीच केला आहे. हा शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे घरचा आहेरच आहे. रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे बंडखोरांनी भाजपसोबत जाण्यासाठी पैसे घेतले, या विरोधकांच्या दाव्याला बळ मिळू शकते. त्यामुळे आगामी काळात ‘५० खोके, एकदम ओक्के’चा प्रचार पुन्हा जोमाने होऊ शकतो. त्यामुळे आता हा सगळा वाद एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, कसा हाताळणार, हे पाहावे लागेल.

हे ही वाचा :

पंतप्रधान मोदी कारगिलमध्ये जवानांसोबत करणार दिवाळी साजरी

Diwali 2022 : मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ‘दिवाळी पाहाट’ निमित्त उपस्थित, ठाणेकरांच्या जल्लोष द्विगुणीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version