spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रिय लोकशाही , नक्की काय म्हटलंय सुषमा अंधारेनी पत्रात

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीहक्कभंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्र लिहिलं आहे.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीहक्कभंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्र लिहिलं आहे. मी माफी अजिबात मागणार नाही. यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, असं अंधारे यांनी पत्रात म्हटलं आहे.

सुषमा अंधारेंचे पत्र , नक्की काय म्हटलंय पत्रात

प्रिय लोकशाही ,
तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे.

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील ‘व्यक्तीने’ माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे.

ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले, किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहूत, नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले.माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे.

ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे.

सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत पण जर खरेच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग या सभापती पदाचे किंवा या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबार मध्ये मंत्री असणारे श्री चंद्रकांत जी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही.

किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तात्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही.

_सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका श्री चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही? अशा भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss