संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड; घराची घेतली झडती…

प्राथमिक माहितीनुसार, ईडीचे पथक सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले.

संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड; घराची घेतली झडती…

मुंबई: शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले नेते म्हणून ओळख असणाऱ्या संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. काहीवेळापूर्वीच संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले आहे. त्यानंतर ईडीने याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे.

ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आता थेट संजय राऊत यांच्या घरी धाड टाकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ईडीचे पथक सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले. याठिकाणी आल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी घराची झडती घ्यायला सुरुवात केली व सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे ताब्यात घेतली जात असल्याचे समजते.

संजय राऊत यांना दोनदा समन्स बजावत, ईडीने काही दिवसांपूर्वीच चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण संजय राऊत दिल्लीत असल्याने ते ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. पण ईडीने त्यांची मागणी फेटाळत त्यांना नवीन समन्स दिले होते. त्यानुसार आता संजय राऊत यांना २७ जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहायला सांगितले होते. पण संजय राऊत तेव्हाही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता ईडी थेट राऊत यांच्या घरीच पोहोचली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार आणि चौकशी ईडी संजय राऊत यांना अटक करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

Exit mobile version