मिल बैठे तीन यार…!

राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घनिष्ट दोस्ती आहे.

मिल बैठे तीन यार…!

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घनिष्ट दोस्ती आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांचीही मैत्री आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या खासदार मुलाशी अगदी मित्रासारखेच वागतात. या तिन्ही मित्रांमध्ये गेले दोन-तीन दिवस प्रचंड तणाव निर्माण झालाय. याच तणावाचा फटका सरकारला किंवा शिंदेशाहीला बसू नये म्हणून ह्या तिघांनी गुरूवारी संध्याकाळी मलबार हिल वर ‘मिल बैठे तीन यार’ केले.

‘राष्ट्रात मोदी राज्यात शिंदे’ या घोषवाक्यासह १३ जून रोजी राज्यातील प्रमुख दैनिकांत पहिल्या पानावर संपूर्ण पानभर जाहिराती देण्यात आल्या. या जाहिरातीत फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे काकणभर सरस असल्याच्या प्रतिमा निर्मितीच्या जाहिराती देण्यात आल्या. या जाहिराती प्रकाशित करणाऱ्याचे नाव गावही जाहिरातीत नव्हते. मात्र टाईम महाराष्ट्रच्या विश्वसनीय सूत्रांनुसार या जाहिराती एका गुजराती हितचिंतकाने दिल्या होत्या. त्यासाठी एका खाजगी वृत्तवाहिनीचा कथित हवाला दाखला म्हणून देण्यात आला. त्यानंतर युतीमध्ये जणू भूकंपच झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खिजवण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून झाल्यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा आणि त्यांच्या शिवसेनेचा समाचार घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला.

एका अमराठी जाहिरात कर्त्याने मराठीचे तीन तेरा वाजवत ही जाहिरात बनवली. या जाहिरातीच्या भूकंपाचे हादरे बसल्यानंतर डॅा. श्रीकांत शिंदे यांना थेट दिल्लीला बोलावण्यात आलं. या अॅड वॅार मुळे नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कानदुखीचे कारण देत दाखवलेल्या या नाराजीने मुख्यमंत्र्यांसह सरकारचेही धाबे दणाणले. या अमराठी जाहिरातकर्त्यावर अनेकनेते आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय नाराज असतानाही त्याला डॅा. श्रीकांत शिंदेंचे आशिर्वाद मिळत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. या जाहिरात कर्त्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्या एका वादग्रस्त या निकटवर्तीयाचे भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावून कानउघडणी केली होती. त्यानंतर त्याला खडसावून शिंदेपासून दूर करणायात आले होते. या व्यावसायिक निकवर्तीयाने प्रोत्साहन दिल्याने ही वादग्रस्त जाहिरात सर्वत्र छापून आली. प्रचंड तणाव निर्माण झाल्यावर दुसऱ्या दिवशी नवी फडणवीस शिंदे युतीच्या चित्राची जाहिरात छापून जणू काही सरकारने शुध्दिपत्रक काढल्याचे चित्र बुधवारच्या वर्तमानपत्रांमध्ये दिसत होते. गुरूवारी पालघर मधील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला शिंदे-फडणवीस हेलिकॅाप्टरने एकत्र गेले एकत्र आले. मात्र या हवाई प्रवासातही हे दोन्ही मित्र एकमेकाशी बोलले नाहीत. राजभवनला परतून उतरल्यावरही दोघांच्या चेहऱ्यावरचा तणाव साफ दिसत होता. या तणावपूर्ण स्थितीत दोन्ही नेत्यांनी गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या वितरणाचा आमदार सुनिल राणेंनी विनंती केलेला कार्यक्रम मात्र स्वीकारला.

या कार्यक्रमाआधी सह्याद्री अतिथी गृहात खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमातही उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण जाणवत होता. या कार्यक्रमात १७५ गिरणी कामगारांना घरांच्या चाव्यांचे वाटप करून दोन्ही नेते शेजारच्याच तीन क्रमांकाच्या शंकरराव चव्हाण सभागृहात पोहचले. तिथे आधीच खासदार श्रीकांत शिंदे यांची व्यवस्था करण्यात आली होती. शिंदे- फडणवीस
यांनी या तिघांच्या व्यतिरिक्त चौथी कोणतीही व्यक्ती शिरणार नाही याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे खासगी पीए प्रभाकर काळेंवर सोपवली होती. बाहेर किमान २५/३० सुरक्षा रक्षकांनी या प्रवेशद्वारा बाहेर कडे केले होते. या बंद दरवाजा जवळ मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रविण दरेकर, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह किमान १०-१२ आमदार बाहेर उभे होते. यातील काहीजण मुख्यमंत्र्यांसाठी तर काही उपमुख्यमंत्र्यांसाठी ताटकळत होते.

या तिघांमध्ये ३६ मिनिटे बैठक झाली. त्यानंतर डॅा. श्रीकांत शिंदे यांना बाहेर जाऊ देण्यात आले. त्यानंतर १० मिनिटे शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा झाली. ही बैठक झाल्यानंतर फडणवीस आपल्या दालनात गेले तर खासदार श्रीकांत शिंदे आपल्या पूर्वनियोजित पण विलंब झालेल्या कार्यक्रमासाठी लगोलग रवाना झाले. मुख्यमंत्री शिंदे ही सह्याद्रीतून आपल्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले.
या बैठकीत खासदार डॅाक्टर श्रीकांत यांच्या किंवा शिंदे कुटुंबियांच्या कोणत्याही निकटवर्तीयांमुळे मुख्यमंत्री किंवा सरकार अडचणीत येणार नाहीत याची जबाबदारी खासदार शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली. तसेच खासदार शिंदे यांनी आपल्या वडीलांसारखे शांत, संयमाने राजकारण करावे असा मैत्रीपूर्ण सल्ला त्यांना फडणवीसांनी दिला. आणि त्यानंतर ‘मिल बैठे तीन यारोंकी’ ही बैठक आटोपली.

हे ही वाचा:

अजित पवारांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

लाच घेणारे तीन पोलीस हवालदार निलंबित!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version