शिंदे काका आदित्य बाबाला का सांभाळतात?

मुख्यमंत्री झाल्यावरही ठाकरे पिता-पुत्र शिंदेंना टोमणे मारायची संधी सोडत नाहीत.

शिंदे काका आदित्य बाबाला का सांभाळतात?
मुंबई – राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव घेऊन टीका केलेली नाही. इतकंच काय पण शिवसेनेतून ज्या उध्दवपुत्र आदित्य ठाकरेंमुळे शिंदेंना कमालीचा जाच सहन करावा लागला. मुख्यमंत्री झाल्यावरही ठाकरे पिता-पुत्र शिंदेंना टोमणे मारायची संधी सोडत नाहीत. त्या आदित्य ठाकरेंना अजूनही मुख्यमंत्र्यांनी करारा जवाब दिलेला नाही. उलट मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांनी ‘आदित्य बाबाला’ पंखांखाली घेण्याचंच काम केलेलं आहे.
   विधिमंडळामध्ये चार जुलै रोजी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला. ते हा ठराव जिंकू शकणार नाहीत असे शिवसेनेला वाटत होतं. मात्र पक्षात  उठाव केलेले चाळीस आमदार, त्याला मिळालेली अपक्षांची साथ आणि भाजपच्या ११५ आमदारांचा भक्कम पाठिंबा याच्या जोरावर १६४  विरुद्ध ९९मतांनी  शिंदे सरकारने विश्वास दर्शक ठराव जिंकला. त्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी  ठाकरे गटाच्या१४ आमदारांना  व्हीप न पाळल्याबद्दल आपल्यावर कारवाई का करू नये असा प्रश्न विचारणाऱ्या नोटीसा पाठवल्यात. या १४ आमदारांमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि  माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्यावर केलेले उपकार लक्षात घेता त्यांचे नातू असलेले आदित्य ठाकरे यांना नोटीस न बजावण्याचा निर्णय एकनाथ शिंदे गटाने घेतला होता. याबद्दल काहींनी समाजमाध्यमांवर आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी एकनाथ शिंदे यांना शाबासकी ही दिली.
    मुंबईत मुसळधार पाऊस सोमवारी रात्रीपासून सुरू झाला. मंगळवारी तर सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पूर परिस्थिती निर्माण झाली होती. उपनगरी रेल्वे सेवा कोलमडली होती. त्याचवेळी  दर पावसाळ्यात पाणी साचून मुंबईला बेहाल करणाऱ्या दादरच्या नायगांव जवळील हिंदमाता जवळ यंदा पाणी  साचले नाही. या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची अद्ययावत यंत्रणा मुंबई महानगरपालिकेतर्फे बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा बसवण्याची संकल्पना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची होती. यंदा या ठिकाणी पाणी न साचल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्थित सुरू होती. मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट दिली या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हिंदमाता जवळ पाणी न साचल्याबद्दल पालिका प्रशासनाचे कौतुक केले. ‘हिंदमाता परिसरामध्ये पाणी न साचल्याबद्दल मी मुंबई महापालिकेला धन्यवाद देतो. अभियंते,तंत्रज्ञांनी  कौतुकास्पद कामगिरी केली आहे. असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांना कौतुकाची पावती दिली आहे.
      शिवसेनेत नगरविकास मंत्री म्हणून काम करताना आदित्य ठाकरे आणि युवा सेना सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्या अति हस्तक्षेपामुळे एकनाथ शिंदे पुरते हैराण झाले होते. या हस्तक्षेप आणि अपमानाची परिसीमा ओलांडल्यावर त्यांनी काही सहकाऱ्यांना आपल्या सोबत घेत शिवसेनेत उठाव केला. आणि त्यानंतर त्यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचा जाहीर कार्यक्रमात ‘शिंदे साहेब’असा उल्लेख करीत तर खाजगी कार्यक्रमांमध्ये, निकटवर्तीयांमध्ये  ते मुख्यमंत्री शिंदे यांना ‘शिंदे काका’ असे आपुलकीने म्हणत असत. मात्र प्रत्यक्षात राजकारणात आदित्य ठाकरे यांच्यासाठीच एकनाथ शिंदे यांचा राजकीय बळी घेतला गेला असे शिवसेनेत म्हटले जाते. याउपर मुख्यमंत्री म्हणून काम करताना एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना झुकतं माप द्यायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे हे कोणावरही बोचरी किंवा वर्मी लागेल अशी टीका करीत नाही त्यात आदित्य ठाकरे हे तर ठाकरे कुटुंबाचा विकपॉईंट आहेत. आणि त्यामुळेच ‘शिंदे काकां’कडून ‘आदित्य बाबाला’ विशेष वागणूक दिली जात असल्याचे आमदारांमध्ये चर्चा आहे.
Exit mobile version