spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

EXCLUSIVE,कोकणातून लोकसभेत कोण जाणार? राऊत,राणे,जठार की सामंत…

मालवण – टीम टाईम महाराष्ट्र- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी २०२४ मध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार दिल्लीत पाठविण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून १६ लोकसभा मतदार संघांवर भाजपने लक्ष केन्द्रीत केले आहे. त्यात आता माढा आणि सोलापूर या दोन मतदार संघांची भर पडली आहे त्यामुळे ही संख्या १८ झाली आहे. कमळ निशाणीवर जास्तीत जास्त खासदार दिल्लीत पाठवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून भाजपने सिंधुदुर्ग- रत्नागिरीत विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. या लोकसभा मतदार संघातून उध्दव सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना थोपवत केंद्रीय मंत्री नारायण राणे जाणार की भाजप-आरएसएसच्या मुशीत तयार झालेले माजी आमदार प्रमोद जठार जाणार की उद्योगमंत्री उदय सामंतांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत दिल्ली गाठणार यावर भाजपच्या सभेनंतर मोहोर उमटवणार आहे.

भाजपने गेल्या २५ वर्षात कोकणात झालेल्या जाहीर सभांच्या भव्यतेचे विक्रम मोडीत काढत मसुरे येथील आंगणेवाडी जवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा आयोजित केली आहे. विधानपरिषदेतील शिक्षक मतदार संघात विजय मिळवलेल्या भाजपने उध्दव सेनेच्या विनायक राऊतां ऐवजी कमळ निशाणीवर निवडून येणारा खासदार दिल्लीत पाठवायचा चंग बांधलाय. सध्या मित्र पक्ष आणि विरोधक यांच्या कडे असलेले १६ मतदार संघ भाजप खेचण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यात माढा आणि सोलापूरची भर पडून ही संख्या १८ झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाचा फायदा उचलत भाजपचा खासदार दिल्लीत पाठवण्याची हीच वेळ आहे असं मानत तुफानी शक्तीप्रदर्शनाला सुरूवात केली आहे. या लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभा लढवण्याचा मानस आहे. २०१४ मध्ये विधानसभेला नारायण राणेंचा वैभव नाईक यांनी १०३७२ मतांनी पराभव केला होता. राणे -ठाकरे यांचे वैर सर्वश्रुत आहे. वयाची सत्तरी पार केलेले राणे शारिरीक मर्यादा असतानाही त्वेषाने सेनेवर तुटून पडतील. मात्र राणे उमेदवार असले तर शिवसेना दुप्पट त्वेषाने उतरू शकते. हे पाहून राणेंचे जिल्ह्यातील बाहेरील विरोधक छुप्या मार्गाने विरोधकांना मदत करण्याची दाट शक्यता आहे. माजी खासदार निलेश राणे यांना तिकीट मिळाली तर ठाकरे सेनेसाठी ती बंपर लॅाटरी ठरेल. आगामी राज्य मंत्रीमंडळ विस्तारात नितेश राणे मंत्री झाल्यास एकाच कुटुंबात किती सत्तापदे द्यायचा हा प्रश्नही पक्षश्रेष्ष्ठींना निरूत्तर करू शकतो. माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नावाचाही विचार सुरू आहे. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी निरूपद्रवी असलेले जठार आरएसएसचे निष्ठावंत. सुरेश प्रभूं प्रमाणेच विस्कटलेल्या साध्या राहणीमानासाठी परिचीत असलेले जठार यांनी २०१४ साली पक्षनिष्ठेसाठी शिवसेनेचे तिकीट नाकारले आणि तेव्हापासून ते अद्यापही राजकीय प्रेक्षक गॅलरीतच बसून आहेत. विनायक राऊत यांनीच शिष्टाई करत प्रमोद जठार यांना मातोश्रीवर नेले होते. तो सेनेचा प्रस्ताव जठार यांनी नाकारला होता. कमळ निशाणीवर जाण्याचा मान त्यांचा सर्वप्रथम असल्याचं भाजप-सेनेचे जुने कार्यकर्ते मानतात. मात्र त्यांच्या पक्षनिष्ठेला झाकोळण्याची ताकद किरण सामंत यांच्या लक्ष्मीउपासनेमध्ये आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. २०१९च्या निवडणूकीत रत्नागिरीतून ६०००० मतांचे मताधिक्य त्यांनी आणि उदय सामंत यांनीच विनायक राऊतांना मिळवून दिले होते . आता ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आहेत. ही जागा भाजप बरोबरच्या वाटाघाटीत शिंदे गटाकडे गेली तर किरण सामंतांची उमेदवारी निश्चित आहे. बंधू उदय कुठल्याही पक्षात-गटात जाऊनही त्यांना मंत्रीपद मिळत असल्याने किरण सामंतांना कोकणातील दोन्ही जिल्ह्यात तळागाळात जाऊन पक्ष बांधणी करता आली असल्यामुळे ते अधिक प्रभावशाली ठरू शकतात. सामंत कुटुंब व्यावसायिक असल्यामुळे ते राणे कुटुंबासारखे कुणाशीच हाडवैर बाळगत नाही, राजकारणही ते व्यावसायिक दृष्टिकोनातून करतात गोष्ट भावनिक कोकणी मतदारांना आकर्षित करू शकते.

सेनेच्या विनायक राऊतांनी सलग दोन वेळा खासदारकी भूषवल्यानंतरही त्यांना विकासकामांची ठाशीव मोहोर उमटवता आलेली नाही. नारायण राणे कुटुंबाशी शाब्दिक वाद घालणे हाच यशाचा मार्ग असा समज त्यांनी करून घेतलाय. त्यामुळे त्यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यास विरोधी लहरीचा फटका ठाकरेसेनेला बसू शकतो. त्यांच्या ऐवजी दुसरा स्थानिक उमेदवार निवडताना पक्षाकडे फारसे पर्याय नाहीत.

भराडी देवीच्या जत्रेच्या निमित्ताने दर्शनाला येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नारायण राणे यांनी आपल्या निवासस्थानी येण्याचं निमंत्रण दिले आहे. या दोन नेत्यांच्या भेटीत आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच कोकणातल्या ‘कमळ फुलवा’ अभियानाची बीज रूजलेली आहेत.

हे ही वाचा : 
Tasty Veg Manchurian Gravy नक्की ट्राय करून बघा

Exclusive, मालवणच्या आंगणेवाडीत भाजपची भव्य राजकीय जत्रा
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss