फडणवीसांना पुतळ्याविषयी फक्त राजकीय प्रेम, आमच्या विरोधात आंदोलन म्हणजे निव्वळ मूर्खपणा- Sanjay Raut

फडणवीसांना पुतळ्याविषयी फक्त राजकीय प्रेम, आमच्या विरोधात आंदोलन म्हणजे निव्वळ मूर्खपणा- Sanjay Raut

आम्ही आंदोलन करतोय म्हणून भाजप आमच्या विरोधात आंदोलन करणार हा त्यांचा मूर्खपणा असल्याचे मत शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी आज १ सप्टेंबर २०२४ रोजी जोडे मारो आंदोलन करणार आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफीसुद्धा मागितली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे. आज मुंबईत सरकारविरोधात महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन सुरु आहे. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

महाराष्ट्रात आज शिवद्रोही सरकार आहे. त्याविरोधात राज्यात जोडे मारो आंदोलन आहे. महाराष्ट्रात महाराज्यांचा वारंवार अपमान केला जातोय. भ्रष्टाचारातून हे सर्व घडतंय. माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. लोकशाहीत सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे. जर तुम्ही परवानगी देणार नसाल तर ही हुकूमशाही आहे. आम्ही फक्त जोडे मारो आंदोलन करत आहोत, महाराज असते तर कडेलोट आंदोलन केलं असतं, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. आम्ही आंदोलन करतो म्हणून भाजपचे मूर्ख आमच्या विरोधात आंदोलन करत आहेत, हा त्यांचा मूर्खपणा आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज ट्रेनचा मेगाब्लॉक वाढवला आहे. हे भय का, का अडवलं जातंय? असा सवाल विचारत संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. याचे सर्व सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस यांना फक्त पुतळ्याविषयी राजकीय प्रेम आहे. तुमचे भाजपचे राज्यपाल महाराजांचा अपमान करत होते तेव्हा तुम्ही गप्प बसले. यातून चांगलंच घडणार असेल, असं तुमचा एक मंत्री बोलतो तेव्हा तुम्ही का गप्प बसलात? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फौजफाटाही तयार ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.

हे ही वाचा:

Exit mobile version