spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“मी आता अमृता वहिनींनाच सांगणार आहे की…”; अजित पवारांच्या विधानामुळे अधिवेशनात पिकला हशा

मी आता अमृता वहिनींनाच येऊन सांगणार आहे की जरा बघा यांच्याकडं. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे

आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका क्षणाला कौतुक तर दुसऱ्या क्षणाला टोमणे असं करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला होता. अजित पवार यांनी आज विधानसभेमधील भाषणामधून वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत मांडले. विशेष म्हणजे एका मुद्द्याबद्दल बोलत असताना अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा हवाला दिला आणि त्यामुळे सभागृहात अचानक विनोदी वातावरण निर्माण झाले.

“भाजपामध्ये आता जे नाते काम करतात त्यात सगळ्यात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस आहेत. कुणी काहीही म्हटलं, कितीही गप्पा मारल्या तरी आहे ते आहे. असं असताना आपण काही लोकांना संधी दिली,” असं अजित पवार म्हणाले. बानकुळेंनी बारामतीमध्ये घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करण्याची टीका केली होती त्याचा उल्लेख करत अजित पवारांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना खोचक टोले लगावले. “अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यावर आपल्यानंतरचे नेते हे बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अशाप्रकारच्या वल्गना ते करतात. आता आमचं तिथं काम आहे खरंच तिथं करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?” असा सवाल यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना केला.

“आपण सहकार मंत्री आहात. पूर्वी औरंगाबादचे विनायकराव पाटलांनी सहकारमंत्रीपद फार चांगलं भूषवलं होतं. पण अजून तुम्ही सहा महिन्यांमध्ये त्या खात्यात रुळलाच नाहीत. काही तुमच्याकडे काम आणलं की देवेद्रजींना विचारतो,” असं म्हणत पवारांनी अतुल सावेंवर टीका केली. पुढे अजित पवारांनी, “अरे, देवेंद्रजींकडे सहा खाती आहेत ना बाबा. अजून तुमच्या खात्याचा भार त्यांच्या डोक्यावर कशाला टाकताय? ते कतृत्ववान असल्याने सहा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहेत. पण त्यांनी सहा पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त चांगलं होणार नाही?” असा खोचक प्रश्नदेखील त्यांनी सरकारला विचारला.

शिंदे सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याच्या मुद्दयांवर लक्ष केंद्रित करत, “आज इथल्या (सभागृहातील) महिला बाहेर गेल्या आहेत. तुम्ही महिलांबद्दल सांगताय. भाजपालाही महिलांची मतं मिळाली.सहा महिन्यात एक महिला सापडेना तुम्हाला मंत्री करायला? अरे हा कुठला कारभार?”, असा उपहासात्मक प्रश्न अजित पवारांनी शिंदे सरकारला केला.

देवेंद्र फडणवीसांकडे पाहत अजित पवारांनी, “मी आता अमृता वहिनींनाच येऊन सांगणार आहे की जरा बघा यांच्याकडं. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे,” असं म्हटलं अन् सभागृहामध्ये एकच हशा पिकला. “मी टीका म्हणून बोलत नाही. आपण महिलांना पुरुषांच्याबरोबरीनं कामाची संधी द्यावी. निर्णय प्रक्रियेत घ्यावं,” असं अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

मला धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटले, IPL लिलावात विकला न गेल्याने ‘या’ वेगवान गोलंदाजाने व्यक्त केले आश्चर्य

Anil Deshmukh यांना कोर्टाचा मोठा दिलासा ! । NCP

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss