मोर्चा नॅनो आहे तर तुमचं सरकारही नॅनो, सरकार पडणार असं म्हणतं राऊतांनी केला हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न यासह विविध मुद्द्यांवरून काल महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मोर्चा नॅनो आहे तर तुमचं सरकारही नॅनो, सरकार पडणार असं म्हणतं राऊतांनी केला हल्लाबोल

Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न यासह विविध मुद्द्यांवरून काल महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा ‘नॅनो मोर्चा’ असल्याची टीका केली होती. दरम्यान, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी काल स्पष्ट केलं. राऊत यांनी आज आपल्या या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नाही. हेच वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदार आणि त्यांच्या नेत्याने केलं असतं तर समजू शकलो असतो. कारण त्यांची बुद्धी नॅनो आहे, हे आम्हाला माहिती आहे.नॅनो गोष्टी फार टिकत नाही. नॅनो कारचा कारखाना बंद झाला आहे. अशा फॅक्टऱ्या अधिक टिकत नाहीत. नॅनो हा शब्द फडणवीसांनी दिला म्हणून वारंवार वापरतो. त्यांनी हा शब्द वापरून चूक केली. मोर्चा नॅनो आहे तर तुमचं सरकारही नॅनो आहे. हे सरकार पडणार हे मी सांगतो तेव्हा त्यात तथ्य असतं. पडद्यामागे काय चाललं हे त्यांना माहीत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

फडणवीस प्रगल्भ राजकारणी. त्यांनी विरोधी पक्षात प्रदीर्घ काळ काम केलं. त्यांना कालचा विराट मोर्चा दिसला नसेल, त्यांनी अनुभवला नसेल तर हे त्यांचं दुर्देव आहे, असा टोला त्यांनी लगावला. कालचा मोर्चा नॅनो आहे, अपयशी आहे, फेल आहे. अशी भूमिका त्यांनी घेतली असेल तर मधल्या काळात फडणवीस दिल्लीत गेले होते. तिकडे दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं इजेक्शन दिलेलं दिसतंय. ती गुंगी त्यांची उतरलेली नसल्याचं दिसतं, असा चिमटाही त्यांनी काढला. “देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मोर्च्याचे स्वागत करायला हवे होते. तसेच त्यांनी या मोर्चाला सामोरे जायला हवे होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कालचा मोर्चा हा सरकारविरोधी नव्हता, हा मोर्चा हा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात होता. त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची जनता काल एवटली होती. मात्र, तुम्ही ज्या भाषेत त्यांच्या विरोधात बोलत आहात, हे राज्यकर्ता असल्याचे लक्षण नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अपमान केला. त्याविरोधात महाराष्ट्राची शक्ती एकवटली होती. अशावेळी कालचा मोर्चा दिसला नाही. त्यांच्या डोळ्यात बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे महाराष्ट्र द्वेषाचा वडस आला आहे. इतका पराकोटीचा महाराष्ट्र द्वेष राज्यकर्त्यांमध्ये आम्ही गेल्या ७० वर्षात पाहिला नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

शरद पवार हे मोठे नेते आहेत. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. इतके वर्ष ते काम करत आहेत. ते कुणाच्या बुद्धीने चालत नाहीत. मी पवारांचं नेतृत्व मानतो. ठाकरे हे सेनापती आहेत. सेनापती आदेश देतात ते आम्ही मानायचे असतो. बावनकुळे यांनी शरद पवारांवर बोलू नये. मोदीही पवारांना गुरु मानतात हे बावनकुळेंना माहीत नाही. बावनकुळे फक्त फडफडत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

हे ही वाचा : 

‘हर हर महादेव’मध्ये स्त्रियांचा बाजार, संभाजीराजेंचा चित्रपटाला विरोध

‘मविआ’च्या महामोर्चासाठी पैसे देऊन गर्दी जमवली, व्हिडीओ शेअर भाजपने केला गंभीर आरोप

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version