Tuesday, September 24, 2024

Latest Posts

नगर-आष्टी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचं आज उद्घाटन झाले आहे.

बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचं आज उद्घाटन झाले आहे. अहमदनगर ते आष्टी अशी ‘डेमू रेल्वे’ सेवा आजपासून सुरु झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले.

अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वे मार्गावरील चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे संपूर्ण बीडवासीयांचं लक्ष लागले होतं. त्यानंतर आज बीडवासीयांचे स्वप्न अखेर पूण झालं आहे, असं म्हणावं लागेल. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचा उद्घाटन समारंभ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती दर्शवली.

आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गामुळे व्यापारी वर्गाला मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

या २६१ किलोमीटर अंतराच्या या एकूण प्रकल्पापैकी अहमदनगर ते आष्टी या ६७ किमी अंतरावर आजपासून डेमो रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्हावासीयांच्या स्वप्नपूर्तीकडे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. अहमदनगर ते आष्टी या ६७ किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी आज धावली. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत केला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी त्यांच्यासमोर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती.

गेल्या ३५ वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. पण स्वातंत्र्यापासूनच बीडकरांनी आपल्या भागातून रेल्वे कधी धावेल, याचं स्वप्न पाहिलं होतं. आज अखेर ते पूर्ण झालं. ही रेल्वे धावण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी संघर्ष केला, त्यांनाच याचं श्रेय जातं, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील रेल्वे प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांनी ही रेल्वे धावण्यासाठी खूप कष्ट घेतले असतील तरीही त्यांचं नाव या रेल्वेला देण्याची मागणी मी करणार नाही, कारण त्यांना ते आवडणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. मराठवाड्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योजक वर्गाच्या दृष्टीने ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लवकरच बीड ते मुंबई असा टप्पा रेल्वेने पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

श्रीकांत शिंदेंचा फोटो होतोय व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार

Dasara Melava : हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, दुपारनंतर पुन्हा सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss