Sunday, June 30, 2024

Latest Posts

जयंत पाटील यांचा राज्यपालांच्या अभिभाषणाला कडाडून विरोध

आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार भाषण केले.

आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार भाषण केले. आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय याशिवाय अभिभाषणात काहीच नाही असे जोरदार प्रहार करत त्यांनी अभिभाषणाला कडाडून विरोध केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणातील मुद्दे जसेच्या तसे – 

– राज्यघटनेबद्दल यांना आदर नाही, सत्ताधाऱ्यांना संविधान बदलण्यासाठीच सत्ता पाहिजे होती. संविधान बदलण्याची भाषा भाजपाची आत्ताची नाही तर ती जुनी आहे. खूप पहिल्यापासून भाजपाची ती भाषा आहे. नुकतेच भाजपाचे एक खासदार म्हणाले की ‘आम्हाला संविधानातील अनावश्यक गोष्टी काढून टाकण्यासाठी ४०० पार जायचे आहे’ आता ज्या संविधानाच्या जोरावर तुम्ही सत्ता मिळवली. त्या संविधानात नक्की अनावश्यक काय आहे ? हे जरा एकदा भाजपने स्पष्ट करावे.

– पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनीही भारताला नव्या संविधानाची गरज आहे असे नमूद केले होते. म्हणजे काय की एकदा खडा टाकून बघायचा की लोकांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत. आणि लोकांच्या टोकाच्या प्रतिक्रिया आल्या की माघार घ्यायची.

– राज्यपालांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या उच्च आदर्शाचे पालन त्यांचे सरकार करत आहे, असे सांगून केली. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का ? २४ डिसेंबर २०१६ रोजी शिवस्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करून पायाभरणी करण्यात आली. आज या घटनेला डिसेंबरमध्ये ०८ वर्ष पूर्ण होतील, मात्र आजपर्यंत तिथे कोनतीही प्रोग्रेस नाहीये.

– राज्यपाल असे म्हणतात कि २०२७-२८ पर्यंत राज्याची एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे आपले लक्ष आहे. ०६ वर्षात महाराष्ट्रात १. ५३ ट्रिलियन डॉलर्स ची गुंतवणूक असेल तरच महाराष्ट्र ०१ ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी होऊ शकते. महाराष्ट्राचा विकासदर १७ टक्क्यांवर गेला तरच ते शक्य आहे.. आत्ता आपला विकासदर ०७ टक्क्यांच्या आत आहे. सत्ताधाऱ्यांचे स्वप्न आहे की महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमी व्हावी पण एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लाभार्थी कोण असणार आहेत…? हे एकदा सरकारने स्पष्ट करायला हवे.

– सरकार सांगतंय की दावोस येथील परिषदेत त्यांनी २०२४ मध्ये ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आणि त्यातून ०२ लाख नोकऱ्या निर्माण होतील. २०२३ मध्ये दावोस मधून ०१. ३७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आणि त्यातून ०१ लाख रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते. मुख्यमंत्री महोदयांच्या या घोषणेला आता दीड वर्ष होईल त्यामुळे या जुन्या एक लाखांच्या पैकी किती जणांना नोकरी मिळाली त्यांची नावे त्यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवावी, अशी आमची मागणी आहे.

– राज्यपाल महोदयांनी रोजगार मेळाव्याच्या बाबतही भाष्य केले आहे. राज्यभरात मोठा गाजावाजा करून हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. बारामतीच्या रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले कि पुढील दोन दिवसांत इथे २५,००० नोकऱ्या दिल्या जातील. वास्तवात तिथे नोकऱ्या मिळाल्या त्या फक्त १२८५… !! म्हणजे दहा टक्के सुद्धा नाही. हे मी म्हणत नाहीये तर इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे.

– शिवडी न्हावा शेव सेतू आपण पूर्ण केला पण या एवढ्या जागतिक दर्जाच्या रस्त्याला आता तडे का गेले आहेत. हे कसं झालं? आता तर राम मंदिरालाही गळती लागली आहे.

– नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आहे. या लोकसभा निवडणुकीची एका वाक्यात माहिती सांगायची झाली तर २०१९ साली नरेंद्र मोदींचे वाराणसीत लीड ०४ लाख ७९ हजार होते ते घटून दीड लाखांवर आले आहे. संपूर्ण निवडणुकीचा मतितार्थ असा की भाजपचा जनाधर घटला आहे. प्रभू श्रीराम आता भाजप सोबत नाही तर आमच्या सोबत आहे. प्रभू रामाचे तिर्थ स्थान आहे तिथे भाजपचा पराभव झाला आहे. मग ते रामटेक असो व काळा मंदिर जिथे आहे ते नाशिक असो किंवा अयोध्या असो… भाजपचा तिथे पराभव झाला आहे.

– काही जण म्हणतात की मुस्लिम आणि दलित समाजमध्ये खोटे कथानक पसरवल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला. राज्यातील मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही दुधखुळे समजता का ? कि कोणीही येऊन काहीही बोलेल आणि ते त्यांच्यावर विश्वास ठेवतील ? मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःची विचार करण्याची शक्ती आहे, बुद्धी आहे.. त्यांनी कोणाचे एकूण नाही तर स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने मतदान केले आहे. पण फक्त मुस्लिम आणि दलित समाजाने इंडिया आघाडीला मतदान केले हे चुकीचे आहे. इंडिया आघाडीला सर्वाधिक मतदान हे सच्चा हिंदूंच्या कडून झालेले आहे. खऱ्या रामभक्तांनी इंडिया आघाडीला मतदान केले आहे. म्हणून महाराष्ट्रात आम्ही ३१ जागांपर्यंत पोहोचलो.

– लोकांनी सत्ताधाऱ्यांना गेली दहा वर्ष जनतेला गृहीत धरण्याची शिक्षा दिली आहे. ही नोटबंदींची शिक्षा आहे, चुकीच्या पद्धतीने कोरोना हाताळणीची शिक्षा आहे, वाढलेल्या बेरोजगारीची शिक्षा आहे. याच निकालाची पुनरावृत्ती राज्यातील जनता विधानसभा निवडणुकीत करणार आहे.

– नागपूरच्या मागच्या अधिवेशनात आमचे उपमुख्यमंत्री म्हणाले की पीएचडी करून मुलं काय दिवे लावणार आहेत ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पीएचडी होते. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख हे सुद्धा पीएच डीच होते, अशी कितीतरी नावे सांगता येतील. आज पीएचडीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मानधनासाठी आंदोलन करत आहेत. फुलेवाडा ते विधानभवन असा लॉन्ग मार्च या विद्यार्थ्यांनी काढला आहे, त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यावे, अशी माझी विनंती आहे.

– एकीकडे मोदीजींचे धोरण आहे कि जी महामंडळे सरकारी पांढरे हत्ती बनले आहेत ती बंद करू शासनाचे पैसे वाचवायचे तर दुसरीकडे आपली जी आत्ताची महामंडळे आहेत, त्यांचाही खर्च आपल्याला जड झालेला आहे, तिसरीकडे तुम्ही रोज नवनवीन महामंडळे स्थापन करत आहात. जितके हे सरकार महामंडळ जाहीर करेल तेवढे महामंडळांचे महत्त्व कमी होईल.

– सुधीर मुनगंटीवार डिसेंबर २०२२ मध्ये म्हणाले होते कि आम्ही २०२३ च्या राज्यभिषेक सोहळ्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि तलवार भारतात आणू, आता २०२४ चा राज्याभिषेक सोहळाही होऊन गेला मात्र अजूनही शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार भारतात आलेली नाही. २०२३ च्या राज्यपाल अभिभाषणात देखील या बाबीचा उल्लेख होता आणि २०२४ च्या राज्यपाल अभिभाषणात देखील या बाबीचा उल्लेख आहे. राज्यपालांना किती अवघडल्यासारखे करणार.

Latest Posts

Don't Miss