जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; राजकीय चर्चेला उधाण

जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; राजकीय चर्चेला उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालीय. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथे या दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील विकासकामा संदर्भात चर्चा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. त्यांच्यासोबत मतदारसंघातील आणखी २० ते २५ स्थानिक नागरिक देखील सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित असल्याची माहिती समोर आलीय. या भेटीत आव्हाड त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात देखील चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय वैर हे सर्वश्रूत आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये प्रवाशांना मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. पण जामिनावर त्यांची सूटका झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड मुंब्र्यातील एका उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले होते. त्यावेळी गर्दीत जितेंद्र आव्हाडांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप एका भाजप महिला कार्यकर्ताने केला होता. महिलेच्या विनयभंगाच्या आरोपांमुळे जितेंद्र आव्हाड अस्वस्थ झाले होते. आव्हाडांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. पण पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेतला. या सगळ्या घडामोडींनंतर जितेंद्र आव्हाडांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आव्हाड आणि मुख्यमंत्री यांच्यात नेमकी का भेट झाली? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

हे ही वाचा : 

Red Sea International Film Festival मध्ये या बॉलीवूड अभिनेत्याचा होणार विशेष पुरस्कार

एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? महाजनांच्या प्रश्नाला खडसेंच प्रतिउत्तर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version