Thursday, July 4, 2024

Latest Posts

तुमचं सगळं सहन करायचं आणि तुमच्या अंगावर गेलं कि निलंबन? Jitendra Awhad यांची Ambadas Danve यांच्या निलंबनावर प्रतिक्रिया

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी काल (मंगळवार, २ जुलै) विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित केले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी “निलंबन हे कारण नसताना राग काढण्याचा प्रकार आहे,” अशी टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यासंदर्भात म्हणाले, “हे निलंबन वैगेरे कारण नसताना राग काढण्याचा प्रकार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने विधानसभेत बोलता, ज्या पद्धतीने लोकांच्या अंगावर जाता ते शोभा देणार आहे का? आज माझेदेखील भाषण बंद पडण्याचा प्रकार झाला. मी काय असंवैधानिक बोलत होतो काय? तुम्ही टीका केली कि तुमचं सगळं सहन करायचं आणि मग तुमच्या अंगावर गेलं कि मग निलंबन… असं थोडी चालत…” असे ते म्हणाले.

शिवसेना आमदार आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज शिवसेना उबाठा पक्षातील ४ ते ५ आमदार आमच्या संपर्कात आहेत तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार हे अजित पवार आणि फडणवीस यांच्या संपर्कात आहेत असे वक्तव्य केले होते. त्यावर मिश्कीलपणे प्रतिक्रिया देत ते म्हणाले, “असतील बाबा असतील… माझं नाव नाही घेतलं म्हणजे नशीब!”

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात व्यक्तव्य करत; “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्र विधानपरिषदेत उमटले प्रसाद लाड यांनी याविरोधात आवाज उठवला असता अंबादास दानवे सोबत त्यांची बाचाबाची झाली आणि याचे पर्यवसन शिवीगाळीत झाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांना विधानभवनाच्या परिसरातदेखील फिरण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. अंबादास दानवे यांनी याबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहीत सदर प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

हे ही वाचा:

Devendra Fadnavis यांनी केली मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

Sambhaji Bhide यांच्या महिलांवरील ‘त्या’ वादग्रस्त व्यक्तव्यावरुन पुण्यात रंगलं ‘बॅनरवॉर’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss