नुपूर शर्मांना २० जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

कोलकाता पोलिसांनी ही नुपूर शर्मांना नोटीस पाठवली आहे. तसेच पोलिसांनी नुपूर यांना २० जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

नुपूर शर्मांना २० जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी नुपूर शर्मा सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी मुंबई पोलिसांनंतर आता कोलकाता पोलिसांनी ही नुपूर शर्मांना नोटीस पाठवली आहे. तसेच पोलिसांनी नुपूर यांना २० जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच नुपूर शर्मांना मुंबई पोलिसांनीही या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

कोलकाता पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे की, भारतीय दंड संहिता च्या कलम १५३ए, २९५ए, २९८ आणि ३४ अंतर्गत नुपूर शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याविरोधात शुक्रवारच्या नमाजानंतर भारताच्या काही भागात झालेल्या हिंसक निषेधानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम बंगालमधील उलबेरिया आणि पंचला, नादिया, मुर्शिदाबाद आणि हावडा येथे दगडफेक व जाळपोळ करण्यात आली होती. बंगालच्या विविध जिल्ह्यांमधून आंदोलकांनी नुपूर शर्मांना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे. मुंबई पोलिसानं पाठोपाठ कोलकता पोलिसांनीदेखील नुपूर शर्मा यांना नोटीस बजावत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शर्मा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Exit mobile version