आपल्या माय मराठीने अभिजात भाषेचे चारही निकष पूर्ण केले तरीही…, छगन भुजबळ

मराठी भाषेने अभिजात दर्जाचे चारही निकष पूर्ण केले असून गेल्या चौदा वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

आपल्या माय मराठीने अभिजात भाषेचे चारही निकष पूर्ण केले तरीही…, छगन भुजबळ

chhagan bhujbal

मराठी भाषेने अभिजात दर्जाचे चारही निकष पूर्ण केले असून गेल्या चौदा वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा यासाठी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने केंद्रसरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे १५०० ते २ हजार वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ स्वरूप व आजचे स्वरूप यांचे नाते असणे हे अभिजात भाषेचे चारही निकष मराठी भाषेने पूर्ण केलेले आहे. मात्र अद्यापही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा प्रश्न रखडलेला असल्याची बाब छगन भुजबळ यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिली.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने तयार केलेला अहवाल केंद्रसरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांनी सर्वानुमते मंजूर केला आहे. त्याला सात वर्षाहून अधिक काळ लोटला गेला असून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. वास्तविक महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली मराठी भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म.राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ मध्येच दाखवून दिले आहे. तसेच यावर दुर्गा भागवत यांनी संशोधन करत विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी जुनी महाराष्ट्री संस्कृत पेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखविले आहे. इतकी मराठी भाषा जुनी आहे. अनेक जुने ग्रंथ देखील उपलब्ध असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

दक्षिणेकडील ७ भाषांना आजवर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेने देखील अभिजात भाषेचे निकष पूर्ण केले असून मराठी भाषेला अभिजात दर्जा तातडीने मिळण्याची आवश्यकता आहे. यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. या प्रश्नासाठी सर्वांचा पाठपुरावा हा अतिशय महत्वाचा असून यामुळे मराठी भाषेच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होईल तसेच देशातील ४५० विद्यापीठांमध्ये ही भाषा शिकविली जाणार आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही छगन भुजबळ यांनी केली.

दरम्यान मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यासह विधीमंडळातील सदस्य असलेले शिष्टमंडळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल व लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

हे ही वाचा :

विधीमंडळ सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही, अजित पवार

Maharashtra Budget Session 2023, आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version