कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा – अजित पवार

राज्यात कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी व कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत.

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा – अजित पवार

ajit pawar

राज्यात कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी व कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. राज्य कबड्डी असोसिएशनसह सर्वांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या पुरुष संघाची कामगिरी उंचावली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचना, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज दिल्या.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीची सभा तसेच कार्यकारणी समितीच्या सभेचे आयोजन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयात करण्यात आले होते.

कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत, त्यासाठी कबड्डीच्या प्रशिक्षकांना दर्जेदार आणि अद्ययावत प्रशिक्षण द्यावे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार समितीच्या सभेत क्रीडा मार्गदर्शकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना करणे, क्रीडा विषयक शासनाच्या विविध योजना खेळाडूंपर्यंत पोहोचवणे या विषयी चर्चा करण्यात आली.

तसेच कार्यकारणीच्या सभेत विविध गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, जिल्हानिहाय राज्य संघटनेचे अभिनव उपक्रम राबविण्यासाठी धोरण निश्चिती, जिल्हा संघटनांच्या कामकाजात सूसुत्रता आणणे, राज्य संघटनेच्यावतीने विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करणे, विविध गटातील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे, खेळाडू निवड प्रक्रियासंबंधी धोरण निश्चिती करणे, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातील खेळाडूंना दर्जेदार साहित्य पुरविणे यांसह इतर मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Exit mobile version