MCA Election 2022 : एमसीएच्या अध्यक्षपदी कोण? क्रिकेटपटू संदिप पाटील की नागपुरी अमोल काळे

देशातील सर्वात मोठ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे नजीकच्या काळात येणारे शेकडो कोटी रुपये आणि त्यासाठी निवडणुकीच्या फडात सर्वपक्षीय राजकारण्यांची युती, नेत्यांकडून पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांची खैरात, महागड्या जेवणावळी आणि दिवाळीपूर्वीच महागड्या भेटवस्तूंची देवाण-घेवाण यामुळे शुक्रवारी २० तारखेला होणारी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक कमालीची वादळी ठरली आहे.

MCA Election 2022 : एमसीएच्या अध्यक्षपदी कोण? क्रिकेटपटू संदिप पाटील की नागपुरी अमोल काळे

देशातील सर्वात मोठ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे नजीकच्या काळात येणारे शेकडो कोटी रुपये आणि त्यासाठी निवडणुकीच्या फडात सर्वपक्षीय राजकारण्यांची युती, नेत्यांकडून पूर्ण न होणाऱ्या आश्वासनांची खैरात, महागड्या जेवणावळी आणि दिवाळीपूर्वीच महागड्या भेटवस्तूंची देवाण-घेवाण यामुळे शुक्रवारी २० तारखेला होणारी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक कमालीची वादळी ठरली आहे. हे सगळं होत असताना ज्या क्रिकेटसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना झालेली आहे त्या क्रिकेटचा आणि त्यातल्या क्रिकेटपटूंचा गळा घोटण्याचं काम राज्यातील बड्या नेत्यांनीच सुरू केलेलं आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणसाठी साडे तीनशे मतदार अध्यक्षपदाची माळ भारताचे माजी कसोटी आणि १९८३ साली विश्व अजिंक्य ठरलेल्या संघातील सदस्य संदीप पाटील यांच्या गळ्यात घालणार की सर्वपक्षीय राजकारण्यांनी डोक्यावर घेतलेल्या आणि मुंबईच्या क्रिकेटची विशेष जवळीक आणि जाण नसलेल्या नागपुरी कंत्राटदार अमोल काळे यांना निवडून देणार का? याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलेलं आहे.

मुंबई क्रिकेटला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटली जाण्याचा काळ आता मागे पडलेला आहे. गेल्या चार वर्षात मुंबई क्रिकेटची मैदानावरची आणि मैदानाबाहेरचीही रया गेलेली आहे. राष्ट्रीय पातळीवर सलग पंधरा वेळा अजिंक्यपद मिळवणाऱ्या मुंबईच्या संघाला देशाच्या वेगवेगळ्या भागातून तयार झालेले छोटे छोटे संघ ही मैदानावर हैराण परेशान करू लागले आहेत. दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशन मधील पदाधिकारी आणि राजकीय नेते आपल्या हातातील राजकीय वजन वापरून मुंबई क्रिकेटला वेठीस धरत आहेत. संघ निवडीमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या छत्रछायेखाली वावरणाऱ्या एमसीए मध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडूंच्या निवडीमध्ये वशिलेबाजी सुरू झालेली आहे. याबद्दलच्या अनेक चिंताजनक चर्चा मुंबईच्या मैदानात फेरफटका मारल्यानंतर ऐकायला मिळत आहेत. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा मुकाबला रंगला आहे. संदीप पाटील हे भारताचे माजी कसोटीवीर, १९८३ सालच्या कपिल देवच्या नेतृत्वाखाली विश्वविजेत्या ठरलेल्या संघातील सदस्य आहेत. तसेच ८० च्या दशकातील भारतीय क्रिकेटमधील तडाखेबंद फलंदाज अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. मुंबई प्रमाणेच मध्यप्रदेशसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या तिथल्या क्रिकेटमध्येही ऊर्जा जागवण्याचे काम केलं होतं. त्यानंतरच्या काळात त्यांनी नैरोबीमध्येही आपल्या प्रशिक्षणाचा आणि व्यवस्थापनाचा प्रभाव पडला होता.त्याच संदीप पाटील यांना सुरुवातीला शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये येण्याचे संकेत देऊ केले होते. त्यामुळे संदीप पाटील अध्यक्ष होतील असं वाटत असतानाच एमसीए मधील राजकारणाने विलक्षण कलाटणी घेतली आणि राजकीय सारीपाटावर एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी हात मिळवणी करत एमसीएमध्ये आपला गट स्थापन केला. त्याला मुंबई क्रिकेट मधील कार्यकर्त्यांनी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभं करत आव्हान दिलेलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मधील कधीकाळी प्रभावशाली असलेल्या बाळ म्हाडदळकर गटाला यंदा सर्व जागांवर आपले उमेदवारही मिळू शकलेले नाहीत. ही निवडणूक शरद पवार, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेली आहे. आपल्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघात प्रभावशाली असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना एमसीएची निवडणूक ही काहीशी जड जाताना दिसत आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करूनही नागपूरमधील कंत्राटदार अमोल काळे यांना मुंबई क्रिकेटची जाण नसल्यामुळेच आणि संपर्काची वाणवा असल्यामुळे संदीप पाटील यांना मात देणं काहीच जड झालेलं आहे. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून अनेक न पूर्ण होणाऱ्या आश्वासनांची प्रलोभन मतदारांना बुधवारी देण्यात आली आहेत.

मुंबईतील वांद्रे विधानसभा मतदारसंघात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आशिष शेलार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये आपला ठसा उमटवता आलेला नाही. अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळूनही शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी भरीव कामगिरी केलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे आशिष शेलार यांच्या तालमीत तयार झालेल्या आणि निकटवर्तीय असलेल्या संजय नाईक यांनी सचिव पदावरून केलेल्या वादग्रस्त कामाने प्रश्न उभे ठाकलेले आहेत. गेल्या काही वर्षात राष्ट्रीय पातळीवर मुंबईचा क्रिकेटचा दर्जा झपाट्याने घसरत आहे. मुंबईतील खेळाडूंच्या गैरसोयी आणि मैदानातल्या समस्या यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या बड्या पदाधिकाऱ्यांनी एमसीएच्या निवडणुकीत देखील फसवी घोषणाबाजी देखील सुरू केलेली आहे. गेल्या चार-पाच वर्षात मुंबई क्रिकेटमध्ये सुरू असलेली बजबजपुरी पाहता संघटनेला आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय काटेकोरपणा यांची नितांत गरज आहे. त्याच वेळी मागील काही पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरची झुंडशाही संघटनेमध्ये आणून एकमेकाला अर्वाच्य भाषेत संभावना करत धमक्या देत मारहाण करण्याचे प्रकारही गेल्या काही वर्षात एमसीए मध्ये सुरू झाले आहेत. ही गोष्ट मतदारांसाठी आणि मुंबईच्या क्रिकेटसाठी खूपच चिंतेची बाब ठरत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शरद पवार ,स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या काळातही ज्या स्वरूपाची धाकटदडपशाही आणि सत्तेचा गैरवापर झाला नाही तितका गैरवापर सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने या निवडणुकीत घडवून आणलाय. राज्याची आणि देशाची सत्ता हातात असल्यामुळे क्रिकेट संघटनांसारख्या निवडणुकीत जे दबाव तंत्र उपयोगात आणलं गेलं त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये एक वेगळी नाराजी पाहायला मिळत आहे. या नाराजीचा भडका मतदानातून झाला तर अमोल काळे यांना त्याचा फटका बसू शकतो. एक गठ्ठा असलेल्या गुजराती आणि मुस्लिम मतदारांमध्ये असलेली नाराजी ही राजकीय उमेदवार असलेल्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी कुणाच्या अंगाशी येणार याबाबतही चर्चेला ऊत आलेला आहे. या निवडणुकीत पाच कार्यकारणी सदस्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. तसेच ॲपेक्स कौन्सिलच्या ९ जागांसाठी २३ उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीत एकूण ३५६ मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत त्यामध्ये २११ मैदान क्लबचे प्रतिनिधी आहेत तर ५८ कार्यालयांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमधून येणाऱ्या ३६ प्रतिनिधींचा कौल कोणाच्या बाजूने जातो यावरही अनेक उमेदवारांनी आपल्या नजरा वळवल्या आहेत. या निवडणुकीत आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडूंना मतदानाची संधी मिळणार आहे. त्यामध्ये ३३ पुरुष खेळाडूंचा आणि १८ महिला खेळाडूंचा अशा ५१ जणांना आपल्या खेळाचा नवा तारणहार निवडण्याची संधी मिळणार आहे. शुक्रवारी २० तारखेला दुपारी तीन वाजता मतदानाला सुरुवात होऊन सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. त्यानंतर मतमोजणी होऊन नव्या अध्यक्षांची आणि त्यांच्या टीमची घोषणा होईल.

हे ही वाचा:

मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात भाजपचे बॅनर; ‘शोधून आणणाऱ्यास ११ रुपयांचे बक्षीस…!”

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, २३ व्या मजल्यावरुन उडी मारून जीवन संपवलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version