”’आता कसं वाटतंय” ? मनसेकडून सेनेला सवाल

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता संघर्षा बाबत अनेक जणं आपले मत मांडत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसात अनेक घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे अनेक जण त्यांच्या बाजूने बोलत आहेत तर अनेकांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध ही केला आहे. या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेकडे बोट दाखवत ”आता कसं वाटतंय” ? असा सवाल करण्यात आला आहे. अलीकडेच मशिदीवरील भोंगा बंद करण्याबाबत मनसे पक्षाकडून भूमिका मांडण्यात आली होती. पण शिवसेना पक्षात अंतर्गत सुरु असलेल्या संघर्षाबाबत मनसे कडून अद्याप मत मांडले गेले नव्हते. पण नुकतेच मनसेकडून काही पोस्टर मुंबईतील साकीनाका परिसरात लावण्यात आले आहे.

एक काळ असा होता जेव्हा शिवसेनेचे भावी नेतृत्व म्हणून राज ठाकरेंकडे पाहिले जायचे. आज ही अनेकांकडून त्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा दिसते असे बोलले जाते. त्यामुळे शिवसेनेचे नेतृत्व पुढे राज ठाकरेंच्या हाती येणार असे अनेकांना वाटले, पण तसे झाले नाही. शिवसेनेचे उत्तराधिकारी म्हणून बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे अधिकार सोपवले. पुढे राज ठाकरे जानेवारी २००६ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मार्च २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१७ साली मनसेचे सात नगरसेवक असताना शिवसेनेने त्यातील सहा नगरसेवकांचा गट फोडला होता. याच घटनेची आठवण करून देणारा फलक मनसेचे महेंद्र भानुशाली यांनी साकीनाका परिसरात लावला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना महेंद्र भानुशाली म्हणाले, “मी राजनिष्ठ कार्यकर्ता आहे. मला वाटलं की त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे. एकनाथ शिंदे तुमचे ३६ आमदार घेऊन गेले. म्हणजे सहा गुणीले सहा. याचा अर्थ सहा पट देवाची लाठी तुम्हाला लागलेली आहे,” असं भानुशाली म्हणाले. शिवसेनेतील बंडखोरीमुळे आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

Exit mobile version