१ जून तुमची पण ३० जून माझी तारीख; मोहित कंबोज यांनी सरकारला ललकारले

मोहित कंबोज यांनी जाहीरपणे सरकारला ललकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप नेते मोहित कंबोज  या व्हिडिओमध्ये म्हणालेत, '१ जून ही महाविकास आघाडीची तारीख आहे.

१ जून तुमची पण ३० जून माझी तारीख; मोहित कंबोज यांनी सरकारला ललकारले
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार अल्पमतात गेल्यावर विश्वासदर्शक ठरावासाठी गुरुवारी ३० जूनला  विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र त्या आधीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. ठाकरे सरकार पडल्यानंतर अवघ्या काही तासातच  एक महिन्यापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी जाहीरपणे सरकारला ललकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप नेते मोहित कंबोज  या व्हिडिओमध्ये म्हणालेत, ‘१ जून ही महाविकास आघाडीची तारीख आहे. पण महादेवा शप्पथ सांगतो ३० जून ही माझी तारीख असेल. आणि मी एक जुलै तारीख येऊ देणार नाही.’ असे आव्हान दिलेला व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात वायरल होत आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या बरोबर असलेल्या कथित व्यावसायिक संबंधांनंतर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगवारी करावी लागली. त्यादरम्यान मोहित कंबोज आणि नवाब मलिक यांच्यात जोरदार मुकाबला रंगला होता. भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांच्या विरोधातही त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कर्ज बुडवल्याप्रकरणी मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.तसेच त्यांच्या कंपनीतील दोन संचालकां विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची त्यांनी फसवणूक केली असून त्यांच्यावर कर्ज न फेडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम ज्या कारणासाठी घेतली होती त्याकरता ते पैसे वापरले गेल्या नसल्याचाही ठपका ठेवून मोहित कंबोज यांना कारवाईला सामोरं जाण्यास भाग पाडण्यात आलं होते. या प्रकरणी चौकशीला सामोरे जाऊन पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मोहित कंबोज असे म्हणाले होते, १ जून ही महाविकास आघाडीची तारीख आहे पण महादेवा शप्पथ सांगतो की ३० जून ही तारीख माझी असेल. एक जुलै तारीख येऊ देणार नाही. असं सांगताना मोहित कंबोज असेही म्हणाले होते, की मला ज्यांनी या कारवाईला सामोरे जावं लागेल लावलं त्याने आपल्या केबिनमध्ये असलेल्या उजव्या बाजूच्या टीव्हीवरून हे माझे आव्हान लक्षात ठेवावे. कंबोज यांच्या ललकारण्याचा व्हिडिओ ३० जून रोजी तुफान वायरल होतोय.
Exit mobile version