spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रकांत खैरेच्या पक्ष फोडी वक्तव्यांवर नाना पाटोल्याचं प्रतिउत्तर

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे सरकार पडणार म्हणून भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा खैरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले आहे. खैरे यांच्या विधानामुळे आता राजकीय वातावरण आणखीनचं तापण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे माजी खासदार आणि राज्यातील महत्त्वाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हा दावा केला आहे. खैरे यांनी औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना हा गौप्यस्फोट करून राज्यातील राजकारणात भविष्यात काय होणार आहे याचे संकेत दिले आहेत. राज्यातील सरकार पडेल म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार आतापर्यंत तयार करून ठेवले आहेत. शिंदे गटाचे १६ आमदार बाद ठरल्यावर सरकार पडू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही तजवीज करून ठेवली आहे. देवेंद्रजी खूप हुशार आहेत. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून त्यांनी हे केलं आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. आतापासून नुकसान होऊ नये म्हणून फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून चेहरा पडलेला असतो. त्यामुळे त्यांचे डावपेच खूप चालू आहेत, असं त्यांनी सांगितलं. निवडणुका कधी येऊ शकतात काळजी घ्या. राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राष्ट्रपती राजवट का लागू होऊ शकते सर्वांना माहीत आहे. राज्यपाल कोणतंच काम करत नाही. आपल्या १२ सदस्यांची विधान परिषदेवरही वर्णी लावली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरल्यास काँग्रेसचे २२ आमदार फडणवीस यांच्यासोबत जातील असे विधान करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. यावर बोलतांना पटोले म्हणाले की, ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असा खोचक टोला पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे. तर खैरे यांच्या विधानामुळे आता काँग्रेस-शिवसेना असा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे आमदार फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे विधान खैरे यांनी केले असले तरीही यापूर्वी देखील काँग्रेस आमदार फुटणार असल्याची अनेकदा चर्चा झाली. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर अशोक चव्हाण,असलम शेख यांच्यासह अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा झाली. त्यात आता खैरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आमदार फडणवीसांच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवली असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

हे ही वाचा :

Virat kohli birthday : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अनुष्कानं मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या

Shalimar Express Fire : नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शालिमार एक्सप्रेसला लागली आग

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांकडून आदित्य ठाकरेंचा ‘रणछोडदास’ म्हणून उल्लेख

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss