Monday, July 8, 2024

Latest Posts

पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे बनवा: Nana Patole

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर (Maharashtra Government) ताशेरे ओढले आहेत. सरकारच्या पीकविमा धोरणांवर टीका करत, ‘पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा,’ अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसेच महसूल विभागाची वेबसाईट हि आजही बंद अवस्थेत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे असताना शेतकऱ्याला मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या मित्रोंबरोबर आहे. महसूल विभागाची वेबसाईट आजही बंद आहे, या बेवसाईटवर नोंद झाली नाही तर पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांची लूट करणारे हे पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, “शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाही शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रात रोज ४ शेतकरी आत्महत्या होत आहेत, अधिवेशन काळातही या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकरी जगला तर देश जगेल म्हणूनच संकटातील शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरसकट कर्ज माफी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे हित साधायचे नाही, भाजपाप्रणित शिंदे सरकार हे शेतकरी विरोधी आहे.”

ते पुढे म्हणाले, “मागासवर्गीय मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, ओबीसी मुलांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती दिली जात नाही. ओबीसी समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे व शेतीपासून बरबाद करायचे हे काम भाजपा सरकार करत आहे. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणाविरोधात आमचा लढा सुरु आहे. शेतकरी, ओबीसी, आदिवासी, एससी, एसटी समाजाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाचा लढा आहे,” असेही पटोले म्हणाले.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss