spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा काँग्रेस पक्षाची सत्ता आणू, नाना पटोले यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते पण भारतीय जनता पक्षाने षडयंत्र करुन ते पाडले. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार यावे यासाठी केंद्र सरकारनेही जोर लावून अनेक आमदारांच्यामागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चौकशांचा ससेमिरा लावला, खोट्या तक्रारीत फसवण्यात आले. ब्लॅकमेल करुन भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता बळकावली. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे चोरांचे सरकार आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे.

मल्लिकार्जून खर्गे हे ‘काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. आपल्या भाषणात भारतीय जनता पक्षाचा समाचार घेत मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आमदार खरेदी करून सरकार बनवले. आज भाजपाकडे तेच लोक आहेत ज्यांच्यावर भाजपानेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पण भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे, उद्या येथे येवूनही मोदी-शहा तेच म्हणतील, डबल इंजिनची सरकार आहे. डबल इंजिनचे सरकार असू दे, नाहीतर आणखी चार बोगी लावा पण जनहिताचे काम काय केले ते सांगा? ‘खोटं बोल पण रेटून बोल’, ही भाजपाची निती आहे, सगळी जुमलेबाजी आहे.

देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, पण तुम्ही कुठुन देता ? हे तर काँग्रेसने केलेले काम आहे. अन्न सुरक्षा कायदा काँग्रेसने दिला, रेशन दुकानांची व्यवस्था काँग्रेस सरकारनेच उभी केली. देशात अन्नांचा तुटवडा असायचा पण काँग्रेस सरकारने हरित क्रांती आणली, धवलक्रांती आणली म्हणून देशात धान्यांची गोदामे भरलेली आहेत. आज मोफत धान्य देत आहेत पण एके दिवशी मोदीजी हे मोफत धान्य सुद्धा बंद करतील.
दलित, महिला, वंचित, मागास, अल्पसंख्याक लोकांना मी मुंबई या ऐतिहासिक शहरातून संदेश देतो की, आपण सर्वांनी मिळून लोकशाही, संविधान वाचवायचे आहे, हे आपले कर्तव्य आहे. आरएसएस, भाजपा लोकशाहीला संपवून हुकूमशाही आणू पहात आहेत. भाजपाने कितीही घाबरवण्याचे काम करु द्या तुम्ही घाबरू नका, खंबीरपणे काम करा, आम्ही तुमच्यासोबत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले हक्क व अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर भाजपाला सत्तेतून खाली खेचा.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाची स्थापना याच मुंबई शहरात झाली व येथून स्वातंत्र्याची मशाल देशभरात गेली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारताकडे काहीच नव्हते पण पंडित जवाहरलाल नेहरुंच्या कुशल नेतृत्वामुळे देशाने प्रगती केली. पण आज केंद्रातील सत्ताधारी हे फक्त देश विकून देश चालवत आहेत. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रा सुरु करताच दिल्लीतील सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच राहुलजी गांधी व पदयात्रेला भाजपा बदनाम करत आहे. आपले पुर्वज जसे इंग्रजांविरोधात लढले त्याच पद्धतीने आपल्याला आता भाजपाविरोधात लढायचे आहे. मुंबई महानगरपालिकेवर अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मागील काही वर्षापासून ती आपल्याकडे नाही पण पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आपण प्रयत्न करु. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, भाई जगताप, खा. इम्रान प्रतापगढी, कन्हैयाकुमार यांनीही यावेळी जनतेला संबोधित केले.

हे ही वाचा : 

खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

शिंदे गटाचा शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा घेतल्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss