spot_img
Saturday, September 14, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Narendra Modi हे SCO शिखर परिषदेसाठी पाकिस्तानला जाणार ?

सध्या राजकीय क्षेत्रावर मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यातच इंटर्नेशनल पॉलिटिक्समध्ये पडसाद उमटताना दिसत आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निमंत्रणावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडे (MEA) कुठलीही अपडेट नाही. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत पाकिस्तानने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवल्याचं सांगण्यात आलं आहे. “आम्हाला एससीओ बैठकीसाठी पाकिस्तानकडून आमंत्रण मिळाले आहे. आमच्याकडे याबाबत कोणतेही अपडेट नाही”, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्टोबरमध्ये इस्लामाबादमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सरकारच्या प्रमुखांच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केले आहे.

या वर्षी पाकिस्तान शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (CHG) चे रोटेशनल अध्यक्ष म्हणून ऑक्टोबरमध्ये दोन दिवसीय SCO शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. “१५-१६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे”, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितलं. भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा एकत्रित बनलेला, SCO हा एक प्रभावशाली आर्थिक आणि सुरक्षा गट आहे. हा सर्वात मोठ्या आंतर-प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटनांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. या प्रमुख प्रादेशिक गटाचा भाग म्हणून, पाकिस्तान आणि भारत दोन्ही शिखर बैठका घेऊ शकतात. 

भारताने गेल्या वर्षी SCO शिखर परिषदेचे आयोजन केले होते, जे व्हर्च्युअल मोडमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी व्हिडिओ लिंकद्वारे हजेरी लावली होती. त्यापूर्वी गोव्यात एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली, तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो त्यात सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. भारत पाकिस्तानमधील तणाव काही नवीन नाही. पाककडून सतत सीमाभागात होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि काश्मीर प्रश्नावरुन भारत-पाकमधील तणाव वाढला आहे. दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी इस्लामाबादवर आहे, असा आग्रह धरत भारताने पाकिस्तानशी सामान्य शेजारी संबंध हवे असल्याचं सातत्याने सांगितलं आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय संसदेने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे संबंध आणखी वाईट झाले आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘आता चर्चेची वेळ संपली आहे’. त्यांचे हे विधान भारताने आता पाकिस्तानला महत्त्व देणे बंद केल्याचे संकेत असू शकतात. २०१५ मध्ये पीएम मोदी अचानक पाकिस्तानात पोहोचले होते आणि त्यांचा पाकिस्तान दौरा म्हणजे भारताने पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत देणारा होता. परंतु त्यानंतरही पाकिस्तान प्रायोजित दहशतवादात कोणतीही घट झालेली दिसून आली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला जाण्याची शक्यता फार कमी आहे, असं दिसून येत आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss