Sanjay Raut सोसायटीची निवडणूक पण लढले नाहीत, आमच्याबद्दल बोलण्याची त्यांची पात्रता आहे का? शिवसेना नेत्याचे राऊतांना खडेबोल

Sanjay Raut सोसायटीची निवडणूक पण लढले नाहीत, आमच्याबद्दल बोलण्याची त्यांची पात्रता आहे का? शिवसेना नेत्याचे राऊतांना खडेबोल

आगामी विधानसभा निवडणूकीच्या (Maharashtra Asembly Election 2024) अनुषंगाने राज्यभरात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाड़ीमध्ये (Mahavikas Aghadi) नेते आणि कार्यकर्ते कसून तयारीला लागलेले आहेत. दोन्हीही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून चर्चांना सुरुवात झाली असून जागावाटपावरून रसीखेच होत असल्याचे दिसत आहे. अश्यातच महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट (Shivsena) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP) हे लोकसभा निवडणुकांमधील मतदानाच्या स्ट्राईक रेटचा दाखला देत अधिक जागांची मागणी करत असल्याची माहिती समोर येत आहे. यावरूनच आता शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर भाष्य केले असून “महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील,” अशी टीका त्यांनी केली. यावर आता शिवसेना खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

नरेश म्हस्के यांनी आज (मंगळवार, १७ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. “संजय राऊत सोसायटीची निवडणूक पण लढले नाहीत, आमच्याबद्दल बोलण्याची त्यांची पात्रता आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काय म्हणाले नरेश म्हस्के?

नरेश म्हस्के यावेळी म्हणाले, “संजय राऊत काय बोलतात त्याच्यावर जी सत्यता असते ती कुठे लपत नसते. आपण पाहत आहात की बहुतेक संजय राऊत यांना त्यांची विधानसभेमध्ये काय परिस्थिती होणार आहे हे कळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याबद्दल ते गुणगाण गायले आहेत. महाविकास आघाडीने यांच्याकडे लक्ष द्यावे की नक्की यांच्या मनात काय चालले आहे? संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बोलण्याची त्यांची पात्रता आहे का ?” असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

ते पुढे म्हणाले, “संजय राऊत सोसायटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीची निवडणूक पण लढलेले नाही आहेत. जे लोकांमधून निवडून आले आहेत त्यांच्यावर टिका करु नये. प्रथम जिथे तुम्ही राहतात तिथे तुमच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आणून दाखवा. आम्हाला काय मिळेल याची संजय राऊत यांनी काळजी करु नये, जे राहुल गांधी यांनी तुम्हाला फाट्यावर मारुन सांगलीत आले आणि विधानसभेची पहिली जाहीर सभा त्या विधानसभा मतदारसंघात घेतली आधी कॉंग्रेसने तुम्हाला तुमची योग्यता दाखवली आहे पहिले ते बघा मग आमच्यावर टिका करा,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यावेळी म्हणाले, “महायुती आम्हाला चर्चा करायची गरज नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महायुतीत भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे. बाकीचे दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहे आणि जेव्हा पक्ष आश्रित असतात, तेव्हा त्यांना आवाज नसतो. भाजपबरोबर स्वाभिमानाने फक्त शिवसेना लढली होती आणि प्रसंगी लाथ मारून आम्ही बाहेर पडलो. अशी हिम्मत दुसऱ्या कोणामध्ये नाही. भाजपमध्ये दिल्लीतील गुजराती व्यापार मंडळ आहे. त्यामुळे जे काही त्यांच्यासमोर येतील ते तुकडे त्यांना स्वीकारावे लागेल. स्वाभिमान, अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. जे काय मिळते ते गप्प पणे घ्या ही भारतीय पक्षाची भूमिका राहील,” असे म्हणत त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समाचार घेतला.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version