…तर मातोश्रीवर जाऊन त्यांची भांडी घासा निलेश राणेंचा दीपक केसरकरांना टोला

निलेश राणे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आता शिंदे गट आणि भाजप मध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

…तर मातोश्रीवर जाऊन त्यांची भांडी घासा निलेश राणेंचा दीपक केसरकरांना टोला

निलेश राणे

मुंबई : गेले काही आठवडे महाराष्ट्रच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येत सरकार स्थापन केले आहे. त्यावरून अजूनही सतत आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. त्यात आता भाजप नेते नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आता शिंदे गट आणि भाजप मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की दोघांनी एकमेकांची लायकी काढली आहे. काल पुन्हा एकदा निलेश राणेंनी ट्विटर वरुन दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे.

काहीच दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपमधील कुणी ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करू नये असे म्हंटले होते. परंतू भाजपकडून निलेश राणे हे वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका करत असल्याने आता यावरून आता निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या कोणत्याही नेत्याने उद्धव ठाकरे किंवा मातोश्री विरोधात टीका करू नये,ती आम्ही खपवून घेणार नाही,अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतली होती. यावर निलेश राणे यांनी ट्विटर ट्विट करत म्हटले, “आणि उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल दीपक केसरकरांना तर जाऊन मातोश्रीवर त्यांची भांडी घासा.” असं निलेश राणे म्हणाले.

 

निलेश राणेंनी या ट्विट आधी ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर करत म्हंटले, भाजपा नेते निलेश राणे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत म्हटलं की, दीपक केसरकर, आपण अलायन्समध्ये आहोत, हे विसरू नका. अलायन्स टिकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच जबाबदारी तुमच्यावर देखील आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे, त्यामुळे तुम्ही कशाला उड्या मारता? मतदारसंघात तुमची काय अवस्था आहे, हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्यावर तरी व्यवस्थित चाला, नाहीतर मतदार संघात तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे, हे विसरू नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे,आम्ही काही गप्प बसणार नाही,” अशा शब्दांत निलेश राणे यांनी केसरकरांना इशारा दिला आहे.

हेही वाचा :

द्रौपदी मूर्मु यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्रीवरील भेट नाही; संजय राऊत

याबाबत स्पष्टीकरण देताना केसरकर म्हणाले की,त्यांची लायकी काय आहे? हे सात वर्षापूर्वी कोकणातील जनतेनं त्यांना दाखवून दिली आहे. ते अजून विसरले नसतील. नाहीतर कोकणातील जनता पुन्हा एकदा त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल. आमचं ठरलं आहे की, भाजपाच्या कोणत्याही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलू नये. पण ते सारखं-सारखं ट्वीट करत होते, त्यामुळे मी त्यांना लहान म्हटलं. त्यांच्या वयानुसार मी त्यांना लहान म्हटलं, कारण ते माझ्या वयापेक्षा निम्म्या वयाचे आहेत. त्यांना लहान म्हणण्याचा अधिकार मला आहे. त्यांना वडीलकीचा मान ठेवायचा नसेल; तर ती त्यांची संस्कृती झाली, असं दीपक केसरकर म्हणाले.

 

Exit mobile version