कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही, ही जाहिरात सरकारची आहे; अनिल परब

कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही, ही जाहिरात सरकारची आहे; अनिल परब

सामना (Saamana) हे शिवसेनेचं मुखपत्र सातत्याने चर्चेत असतं. अग्रलेखातली कठोर भाषा, त्यातून सरकारवर केलेली टीका यावरुन कायमच मोठा गदारोळ होत असतो. आता अग्रलेखासोबत सामना पेपरच्या पहिल्या पानाचीही आता चर्चा होऊ लागली आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून राज्य सरकार तसंच केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जाते. सरकारच्या धोरणावरुन त्यांना धारेवर धरलं जातं. या सगळ्यावर अनेकदा सरकारमधल्या नेत्यांकडून, मंत्र्यांकडून प्रत्युत्तरं दिली जातात, टीकाटिप्पण्यांचं सत्र रंगतं. एकीकडे एवढी टीका करत असताना दुसरीकडे त्यांचीच जाहिरात सामनाने पहिल्या पानावर छापली आहे. त्यामुळे एकीकडे कठोर टीका आणि दुसरीकडे त्यांचीच पहिल्या पानावर पानभर जाहिरात यामुळे आता सामना पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी वक्तव्य केलं आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांनी म्हटले “मला असं वाटतं की जाहिरात सरकार देतं आणि ती सगळ्यांनाच देतं. त्यासाठी कोणाच्या खिशातून पैसे जात नाहीत. हे पैसे तुमचे आमचे सर्वांचे असतात. ही कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही, ही जाहिरात सरकारची आहे आणि जनतेच्या पैशांतून दिलेली आहे. त्यामुळे स्वतःच्या खिशातून पैसे दिल्यासारखं कोणी बोलू नये”.

ठाकरे गटाकडून भाजप आणि शिंदे गटावर सातत्याने आगपाखड केली जात आहे. विशेषत: शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी ठाकरे गटाकडून सोडली जात नाही. अर्थात शिंदे गटाचे नेतेही या सगळ्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. या सगळ्यामुळे सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे-फडणवीस असे चित्र पाहायला मिळत आहे. दैनिक सामनाच्या मुख्य पानावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह एका कार्यक्रमाचे निमंत्रण छापण्यात आलेले आहे. या जाहिरातीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती नाकारल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती पाठवल्या पण त्या नाकारण्यात आल्याचे खासदार शेवाळे यांनी सांगितले. त्यामुळे यावेळी जाहिराती का नाकारल्या गेल्या नाहीत, असा प्रश्न विचारला जात होता.

हे ही वाचा :

Avatar 2 Trailer Out: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

T20 WC 2022 : भारत आणि पाकिस्तान दोघेही उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version