आमच्या ९ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही : शंभूराज देसाई

आमच्या ९ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही : शंभूराज देसाई

तब्ब्ल ४० दिवसानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपात शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला महत्त्वाची खाती मिळाली आहेत. शिंदे गटातील अनेक मंत्र्यांची दुय्यम खाती देऊन बोळवण करण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता संबंधित मंत्र्यांमध्ये नाराजी असून शिंदे गटाचे ३ कॅबिनेट मंत्री आपल्याला मिळालेल्या खात्याबाबत खूश नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना खातेवाटपावर शिंदे गटातील आमदार नाराज नाही. असे स्पष्ट सांगितले.

“खाते वाटपावर (Allocation of Portfolios) आमच्या ९ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. नाराज असल्याचा वावड्या जाणीवपूर्व उठवल्या जात आहेत,” असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटलं. तसंच चांगल्या वातावरणात अधिवेशन (Maharashtra Assembly Session) पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचे कॅबिनेट मंत्रिपद आलं आहे. तसेच खातेबदल संदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आहे. असे देसाईंनी यावेळी स्पष्ट सांगितले.

तसेच शंभूराज देसाई पुढे म्हणाले, सत्ता डोक्यात जाणाऱ्यांपैकी आम्ही ५१ जण बिलकुल नाही. आम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी आहोत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व काम करतो. आम्ही सगळे सकारात्मक दृष्टीने काम करणारे आहोत. आमच्या कोणाचाही डोक्यात हवा जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांची आम्ही शिवसैनिक आहोत. त्यांच्या शिकवणीनुसार आमचं कामकाज राहिल, असं शंभूराज देसाई म्हणाले.

तसेच काल संतोष बांगर यानी उपहारगृह व्यवस्थापकाला कानशिलात लगावण्यासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर आमदार संजय बांगर यांनी अनावधनाने मारहाण केली असावी, असं शंभूराज देसाई म्हणाले. कामगारांना मिळत असलेलं जेवण पाहिलं. त्यांना निश्चित केलेला आहार नसल्याने चिडून बांगर यांनी हात उगारला असेल. पण हात उगारणं योग्य नाही, त्यांनी समजून सांगायला हवं होतं. असे देखील शंभूराज देसाई म्हणाले तसेच उद्या अधिवेशन सुरु होणार आहे. आज मंत्रिमंडळ बैठक होईल. १७ ते २५ पर्यंत हे अधिवेशन पार पडेल. राज्याचे मंत्रिमंडळ आगामी अधिवेशनाला अभ्यासपूर्ण समोर जाईल असे शंभूराजे देसाई यांनी म्हंटले आहे.

विनायक मेटे यांचा अतिशय दुर्दैवी अपघात झाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तपास करण्याचे आदेश दिले. वेगवेगळ्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. चालक, अंगरक्षाकाकडून माहिती घेतली. ज्या वाहनाने धडक दिली त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. जोपर्यंत वेगवेगळ्या यंत्रणांचा चौकशीतून निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. पण राज्य सरकार सविस्तर चौकशी करेल, असं शंभूराज देसाई म्हणाले.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या एका निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. फोनवर ‘हेलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ बोलावं लागेल असा निर्णय मुनगंटीवार यांनी जाहीर केला. यावर शंभूराज देसाई म्हणाले की, “देशप्रेम, राष्ट्रप्रेम हे डोळ्यासमोर ठेवून सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतील. दरम्यान ‘हेलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ बोलण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला. परंतु त्याच वेळी शिंदे गटाचीही काहीशी अडचण झाली आहे. कारण शिवसेने जय महाराष्ट्र बोलण्याची परंपरा आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील आमदारही जय महाराष्ट्र ऐवजी वंदे मातरम् बोलणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

हे ही वाचा :-

जम्मू काश्मीरात आयटीपीबी जवानांची बस दरीत कोसळली, बचाव कार्य सुरू

Exit mobile version