spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रत्येक भेट ही राजकीयच असेल असं नाही, आंबेडकरांनी केली शिंदेंसोबतच्या भेटीची भूमिका स्पष्ट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. मध्यरात्री झालेल्या या बैठकीवर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत काल शिंदेंसोबत झालेल्या बैठकीविषयीची माहिती दिली. यावेळी त्यांची भूमिका स्पष्ट करत ते म्हणाले,”आमची युतीविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपसोबत जो पक्ष आहे त्यांच्याशी आमची कधीच युती होणार नाही. त्यामुळे आमची युती एकनाथ शिंदे गटाशी नाही तर आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत होणार आहे. उद्धव ठाकरे आणि माझ्यात त्याबाबत कमिटमेंट देखील झाली आहे. फक्त जाहीर करणं बाकी आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल रात्री भेट झाली. यावेळी बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. पण पक्षाबाबत आमची जी भूमिका आहे ती ठाम आहे. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिवसेनेसोबत युती करायची आहे. आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबतच निवडणुका लढवणार आहोत, त्यात बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याबाबत आम्ही सांगितलं आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुढे त्यांनी म्हटलं,”भाजप ज्या पक्षासोबत आहे, त्या पक्षासोबत युती करायची नाही हे, आमचं ठरलेलं आहे. आम्ही अशा पक्षांसोबत कधी गेलो नाही. याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आहे. विरोधकांचा विरोधक हा आपला मित्र, हे सूत्रं राजकारणात असतं. आमचं भाजप आणि संघासोबत व्यवस्थेविषयी भांडण आहे. जी व्यवस्था आम्ही उद्ध्वस्त केली, तीच भाजपला पुन्हा आणायची आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आमचं तात्त्विक भांडण आहे,” असं आंबेडकर म्हणाले.

“आम्ही शिवसेनेसोबत जाणार आहोत. युतीबाबत शिवसेनेशी चर्चा झाली आहे. जागा वाटप ठरलं आहे. फक्त उद्धव ठाकरेंनी ते जाहीर करायचं बाकी आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुढे त्यांनी सांगितलं कि, प्रत्येक भेट हि राजकीयच असेल नाही. याबाबत बोलताना ते बोलले,”शिंदेंसोबत सतत भेट होईल. पण प्रत्येक भेट राजकीयच भेट असेल असं नाही. शिंदेनी भाजप सोडली तर शिंदे सोबत जाऊ,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यानंतर त्यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली ते देखील सांगितलं. ते म्हणाले,”इंदू मिल स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचं ओपिनियन अजून आलं नाही. नोएडाला जाईल तेव्हा या पुतळ्याची प्रतिकृती बरोबर आहे की नाही ते पाहणार आहे. महाविकास आघाडी किंवा त्या आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने एक गोष्ट स्वीकारली नव्हती, ती म्हणजे स्मारकात एक इंटरनॅशनल सेंटर असावं. त्याबाबत सात जणांची नावे मी दिली होती. त्यांच्या तीन बैठका झाल्या आहेत. त्याचं काही प्रारुप तयार करण्यात आलं होतं. ते मला जसं पाहिजे तस आहे की नाही, त्या मसुद्यावर काल चर्चा झाली,”अशी माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा:

त्यात छुपं काय?, शिंदे-आंबेडकर भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

शिंदे आणि आंबेडकर यांच्यात मध्यरात्री गुप्त बैठक, कारण काय?, “ही” युती सुद्धा फुटणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss