One Nation, One Election: जर निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? Raj Thackeray यांचा सवाल

One Nation, One Election: जर निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? Raj Thackeray यांचा सवाल

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) या धोरणाबाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने या धोरणाला मान्यता दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण कितपत व्यवहार्य आहे, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाबाबत एक अहवाल सादर केला असता मंत्रिमंडळाने या अहवालात मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकृतरीत्या याची घोषणा केली. आता हे धोरण लागू करण्यासाठी त्याला संसदेत मंजुरी मिळणे आवश्यक असून आता विरोधक यावर काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे असताना आता राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयावर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाष्य केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी. बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो…

पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असे राज ठाकरे ट्विटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis यांनी कितीही गणितं करू द्या, सगळी गणितं मोडून टाकणार; Manoj Jarange Patil यांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version