सेनेत फुटतात नेते, भरडतात मात्र शिवसैनिक !

सेनेत फुटतात नेते, भरडतात मात्र शिवसैनिक !

शिवसेनेत आतापर्यंत पाच मोठी बंड झाली. या पाचही बंडात नेते बाहेर गेले किंवा त्यांना पक्षविरोधी कारवायांमुळे बाहेर काढण्यात आलं. आणि प्रत्येक वेळी या बंडाच्या रणधुमाळीत भरडला गेला तो मात्र शिवसेनाप्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक. सेनेच्या कारकीर्दीतल्या ५६ वर्षांच्या इतिहासातलं सगळ्यात मोठे बंड एकनाथ शिंदे यांनी घडवून आणल्यानंतर आता पुन्हा एकदा याच निष्ठावंत शिवसैनिकाला आपल्या निष्ठांची अग्नीपरीक्षा प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. शिवसेना नेतृत्वाच्या या अजब न्यायामुळे राज्यभरातले निष्ठावंत शिवसैनिक चक्रावून गेले आहेत.

शिवसेनेत १९९१ साली छगन भुजबळ यांनी १८ आमदारांना घेऊन बंड केले. त्यानंतर २००५ मध्ये नारायण राणे यांच्या हकालपट्टी नंतर आणि राज यांनी बंडाचा झेंडा रोवल्यावर तर प्रति शिवसेनाप्रमुखांची मनसेना राजकीय पटलावर दिसते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अल्पावधीतच शिवसेनेवर आलेली ही बंडांच्या ग्रहणांची मालिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सतरा वर्ष थोपवली होती. शिवसेनेच्या इतिहासातला सगळ्यात मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह केलं त्याला आणखी दहा अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. आणि राज्यात भूकंप होत मुख्यमंत्री ठाकरेंच्या सिंहासनाला तडे गेले. त्यानंतर आपण शिवसेनाप्रमुखांचेच शिवसैनिक आहोत असं सांगत एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.त्यामुळे खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची? असा प्रश्नच राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला या सगळ्या बंडाच्या वेळी धर्मसंकटात सापडतो तो मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा आणि शाखेत बसून काम करणारा शिवसैनिकच. पोलिसांच्या केसेस आणि मारामाऱ्या याचा सामना ही निष्ठावंत शिवसैनिकांना करावा लागतो.एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी ही तेच झालं. या आधीचे बंडखोर नेते आक्रमक, शब्दबंबाळ होते. एकनाथ शिंदे हे मात्र मितभाषी, संयमी आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे असल्यामुळे शिवसैनिक पुरता भांबावून गेला आहे. आधीच्या बंडखोर नेत्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली एकनाथ शिंदे मात्र शिवसेनाच सत्तेत असल्याचं सांगत आहेत. आणि त्यामुळेच त्यांना जोरदार पाठिंबा सामान्य कार्यकर्त्यांमधून मिळेल अशी भीती मातोश्रीला वाटत आहे. यासाठीच आता शिवसेनेने निष्ठावंत सैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रतिज्ञापत्रात ‘आम्ही शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आमची शिवसेनेवर निष्ठा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहू’ अशा स्वरूपाची प्रतिज्ञा आता शिवसैनिकांना लिहून द्यावी लागणार आहे. गेल्या काही काळात शिवसेनेमध्ये अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गर्दी केली.त्यामध्ये संजय पाटील,सचिन अहिर, सुभाष भोईर, उर्मिला मातोंडकर, प्रियांका चतुर्वेदी, कृष्णा हेगडे अश्या नेत्यांचा समावेश आहे. त्याचवेळी राज ठाकरे यांच्याबरोबर गेलेल्या अनेक नेत्यांना शिवसेनेने पुन्हा सुचिर्भूत करून पक्षात घेत पद आणि मानसन्मान दिला.

त्यामध्ये दिलीप लांडे, शिशिर शिंदे, दिगंबर कांडरकर, श्वेता परुळकर, संजय घाडी, प्रकाश पाटणकर अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झालं त्या वेळेला सामान्य शिवसैनिकांपासून ते पत्रकारांपर्यंत अनेकांकडे शिवसेना नेतृत्व संशयाने पाहत असते.आताही तीच परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. शिवसेनेचे ४० आमदार अधिवेशन काळात मुंबईच्या बाहेर निघून जातात.राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान असतात त्यांच्या अवतीभवती अनेक लाळघोटे नेत्यांचं कडं ‘थिंक टॅंक’ म्हणून काम करत असतं असल्याचा भास निर्माण करतात. या सगळ्या गोष्टी सामान्य शिवसैनिकांना पचनी पडत नाहीत.याच गोंधळलेल्या शिवसैनिकांना आता प्रतिज्ञापत्राच्या कागदी तुकड्यात बांधण्यात येणार आहे. याआधीही शिवसेनेनं आपल्या कार्यकर्त्यांना मनगटावर भगवा धागा बांधत त्याला ‘शिवबंधन ‘ संबोधले गेले. हेच शिवबंधन मनगटावर बांधत राज्यातले अनेक ‘पडतराव’ नेते शिवसेनेत नेतेपदावर विराजमान झाले. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये खूपच चलबिचल आहे. मात्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विराजमान असल्यामुळे हे शिवसैनिक मूग गिळून बुक्क्यांचा मार सहन करत होते. आता पक्षातलं सगळ्यात मोठे बंड होताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या या शिवसैनिकांनाच संशयाच्या घेऱ्यात उभं करताना प्रतिज्ञा पत्राची टूम काढली आहे. लहानपणापासून लालबाग मध्ये शिवसेनेचाच भगवा झेंडा खांद्यावर घेत पन्नाशी गाठलेल्या एका ऊर्जावान पदाधिकाऱ्याने, याबाबत आपली खंत व्यक्त करताना सांगितले प्रत्येक वेळेला नेते फुटतात. नगरसेवक, आमदार आणि खासदार फुटतात आणि संशय फक्त शिवसैनिकांवर व्यक्त केला जातो या गोष्टीचा शाखेत बसताना आणि संघटनेचे काम करताना प्रचंड मनस्ताप होतो. आता आमची मुलंही सुशिक्षित, तरुण आणि कमावती झाली आहेत. ती ही आम्हाला पक्षाच्या अशा धोरणांबद्दल प्रश्न विचारतात त्यावेळेला अधिक मनस्ताप होतो.’ पक्षाचे हे प्रतिज्ञापत्र गटप्रमुख, उपशाखाप्रमुख,शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदार तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनाही भरून द्यावं लागणार आहे. याबाबतीत शिवसेना भवन असलेल्या दादर परिसरातील एक जेष्ठ महिला पदाधिकारी म्हणाली, आम्ही तीन पिढ्या शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक आहोत आणि आमच्या परिसरात वारंवार पक्षातून बाहेर जाऊन गद्दारी करणाऱ्यांना आमच्या डोक्यावर आमदार-विभाग प्रमुख म्हणून बसवलं जातं. त्यांच्या मुलांना सत्तेतली पदं दिली जातात. मला सांगा नारायण राणे गेल्यानंतर ते पराभूत होईपर्यंत अनवाणी फिरणाऱ्या वरळीच्या आमच्या अरविंद भोसलेला राष्ट्रवादी मधून आलेल्या सचिन अहिर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र द्यावं लागलं तर संघटनेने ही आमची केलेली ऐतिहासिक थट्टाच असेल. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोळसपणे विचार करतील अशी आमची स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

Exit mobile version