Saturday, July 6, 2024

Latest Posts

या ‘पाच’ कारणांमुळे PM Narendra Modi पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या निवडणुकांअगोदर केंद्र सरकारने केलेल्या कॅम्पेनिंगचा फायदा या निवडणुकीत झाला. त्यातील प्रामुख्याने ज्या पाच प्रमुख प्रचारांमुळे ते सत्तेत आले त्याचा आढावा आपण घेणार आहोत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Loksabha Election 2024 Result) देशभरातून एनडीए आघाडीला (NDA Alliance) बहुमत प्राप्त झाले असून एनडीए आघाडीतील मित्रपक्षांनी भाजपला (BJP) पाठिंबा जाहीर करत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा एकदा प्रमुख नेता म्हणून निवडले आहे. त्यानुसार, नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी (PM Narendra Modi Oath Taking Ceremony) भारतीय उपखंडातील ९ देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या येण्याने भारताचे त्यांच्याबरोबर असणारे संबंध अजून दृढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच देशविदेशातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्यासाठी आपली उपस्थिती लावली होती.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर १० वर्षात केलेल्या काही कामांमुळे ते चर्चेत राहिले. कधी त्यांच्या कामगिरीवर कुतुकाचा वर्षाव झाला तर कधी त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. २०१९ साली पुन्हा सत्तेत आल्यानंतरसुद्धा ते कायम चर्चेत राहिले. मात्र २०२४ म्हणजेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीचा ‘४०० पार’ जाण्याचे स्वप्न भंगले. देशभरातून भाजपाला २४० जागा मिळाल्या असून एनडीए आघाडीला २९४ जागा मिळाल्या. या निवडणुकांअगोदर केंद्र सरकारने केलेल्या कॅम्पेनिंगचा फायदा या निवडणुकीत झाला. त्यातील प्रामुख्याने ज्या पाच प्रमुख प्रचारांमुळे ते सत्तेत आले त्याचा आढावा आपण घेणार आहोत.

  • राम मंदिर

लोकसभा निवडणुकीअगोदर राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. अनेक वर्षांपासून विवादित असलेल्या राम मंदिर प्रकरणाचा भाजपच्या काळात सुप्रीम कोर्टात निकाल लागला. त्यानुसार, सुप्रीम कोर्टाने विवादित जागेत राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले. २०२४ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारकडून राम मंदिराचे उद्गाटन करण्यात आले. राम मंदिर जरी अपूर्ण अवस्थेत असले तरीही त्यात प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजित करण्यात आली. देशभरातील हिंदू जनतेसाठी हा खास क्षण होता. यामुळे, राम मंदिर निर्माणाचा फायदा भाजपला झाल्याचे बोलले जाते.

  • कलम ३७०

भारताच्या स्वातंत्र्यानंतर जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन झाले. भारतीय संविधानात जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता. त्यानुसार, जम्मू आणि काश्मीर राज्यात कलम ३७० लागू करण्यात आले होते. या कायद्यानूसार जम्मू आणि काश्मीर राज्याचे स्वतंत्र राज्यध्वज, राज्यघटना आणि अंतर्गत प्रशासनाची स्वायत्तता देण्यात आली होती. २०१९ साली भाजप सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू आणि काश्मीरमधील कलाम ३७० रद्द केले. तसेच जम्मू आणि काश्मीरचा राज्य दर्जा काढून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. कश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्याने इतर प्रांतातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.

  • चांद्रयान मोहीम

भारताच्या इस्रो या अवकाश संशोधन संघटनेची ‘चांद्रयान मोहीम ३.०’ हि यशस्वी ठरली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा इतिहासातील पहिला देश ठरला. संपूर्ण जगभरातून भारताच्या या चांद्र मोहिमेचे कौतुक करण्यात आले. याअगोदर झालेल्या चांद्रयान मोहीम २.० मोहिमेत इस्रोला थोडक्यात अपयश आले होते. त्यानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी जोरदार मेहनत घेत हे मिशन पूर्ण केले होते. या घटनेमुले भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना पुन्हा एकदा जागृत झाली आणि याचे थोडेफार फायदे केंद्र सरकारलाही झाले.

  • रशिया – युक्रेन युद्ध

रशिया आणि युक्रेन यांच्या चालत आलेल्या वर्षानुवर्षांच्या संघर्षाचे अखेर भयंकर युद्धात रूपांतर झाले. रशियन सैनिकांनी युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अनेक लोक मारले गेले. लाखो लोक बेघर झाले. रशियाकडून युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख करण्यात आली. अश्यातच युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थाना याला सामोरे जावे लागत होते. अनेक विद्यार्थी हे युद्धजन्य परिस्थितीत अडकले होते. त्यांना तिथून बाहेर काढण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. परंतु विद्यार्थ्यानी सांगितल्यानुसार, भारतीय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना युक्रेनची सीमा ओलांडून सूरक्षित जागी येण्यास सांगण्यात आले होते. भारतात मात्र याउलट प्रचार करण्यात आला. विद्यार्थ्यांना युद्ध परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना फोन करत रशिया – युक्रेन युद्ध १० तासांसाठी थांबवले होते, असा प्रचार भारतात काही माध्यमांकडून करण्यात आला होता. नंतर भाजपकडूनही लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान युद्ध थांबवल्याच्या जाहिराती टीव्हीवर प्रसारित करण्यात आल्या होत्या. याचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून आले.

  • द काश्मिर फाईल्स, द केरला स्टोरी यांसारखे चित्रपट

मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्मच्या विजयासाठी बॉलिवूडचा मोठा हात असल्याचे समजते. गेल्या काही काळात भारतीय चित्रपटसृष्टीत बनवल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये एका प्रकारे सरकारच्या बाजूने भाष्य करण्यात येत होते. काही चित्रपटांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे विषयदेखील होते. त्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाल्याचंही काही ठिकाणी दिसून आले. द काश्मीर फाईल्स, द केरला स्टोरी आणि अश्या अनेक चित्रपटांमधून एका विशिष्ट समाजाविषयी भाष्य करण्यात आले. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रमता निर्माण झाली. याचा एकप्रकारे फायदा भाजपला झाल्याचे समजते.

हे ही वाचा:

Narendra Modi Oath Taking Ceremony : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ…’

NARENDRA MODI OATH TAKING CEREMONY : मोदींच्या पाठोपाठ घेतली ‘यांनी’ शपथ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss