तीन वर्षानंतर बंदीवासातून सुटलो एकदाचा : रामदास कदम

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर राणें सहित काँग्रेसला आणि राज ठाकरेंना अंगावर घेणारे नेते म्हणून आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना ओळखले जाते.

तीन वर्षानंतर बंदीवासातून सुटलो एकदाचा : रामदास कदम

मुंबई- टीम टाईम महाराष्ट्र : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर राणें सहित काँग्रेसला आणि राज ठाकरेंना अंगावर घेणारे नेते म्हणून आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना ओळखले जाते. कोकणचा ढाण्या वाघ म्हणून शिवसेनेमध्ये परिचित असलेले रामदास कदम यांनी सोमवारी दुपारी आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे यांना सुरू असलेल्या धक्का तंत्राच्या मालिकेतला नवा धक्का देण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झाले. आपल्या नेतेपदाच्या राजीनाम्यानंतर लगेचच प्रसार माध्यमांकडे जाऊन धो-धो बोलण्याचे रामदास कदम यांनी टाळले आहे पण त्याचवेळी ‘टाईम महाराष्ट्र’ बरोबर बोलताना त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांच्यामध्ये सुरू असलेलं कोल्डवॉर नेमकं कोणत्या पातळीला गेलं होतं हे आपल्या लक्षात येऊ शकेल. ‘टाईम महाराष्ट्र’ बरोबर बोलताना रामदास कदम म्हणाले, “तीन वर्षानंतर मी बंदीवासातून मोकळा झाल्यासारखं मला वाटत आहे”.

शिवसेना नेते रामदास कदम प्रक्षोभक भाषणांसाठी ओळखले जातात. २००५ साली नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी शिवसेनेसमोर मसल पॉवर आणि मनीपॉवर च्या माध्यमातून अक्षरशः तांडव सुरू केले होते. त्यावेळी राणेंच्या झंझावाता समोर उभा राहायला कोणताही शिवसेना नेता धजावत नव्हता. अशा स्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी रामदास कदम यांच्यावर सोपवली होती रामदास कदम यांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय देताना नारायण राणेंसह त्यांच्या पाठोपाठ पक्षातून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनाही अंगावर घेतलं होतं कदम यांच्या या भूमिकेमुळे पक्षाची घडी स्थिरसावर होण्यात शिवसेनेला यश आलं. त्यानंतर राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारमध्ये रामदास कदम पर्यावरण मंत्री होते. मात्र त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बनलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना स्थान दिलेले नव्हते तेव्हापासून ठाकरे कदम यांच्यामध्ये कोल्डवॉर सुरू झालं होतं.

गेली तीन वर्ष शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे मातोश्रीवर फिरकले नव्हते. गेली तीन वर्ष त्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास मुलाखती देण्यास ठाकरेंकडून मज्जाव करण्यात आला होता. कोणत्याही स्वरूपात रामदास कदम यांना पक्षाच्या कामकाजापासून आणि नेते पदाच्या सन्मानापासून दूर ठेवण्यात आले होते जे कार्यकर्ते आणि नेते रामदास कदम यांच्याशी संपर्क ठेवतील त्यांची पदं काढून घेण्याचा प्रकारही काही ठिकाणी झालेला आहे. या सगळ्याला कंटाळून रामदास कदम यांनी सोमवारी आपल्या सेनानेते पदाचा राजीनामा दिला आणि राजकीय घटनांनी भरगच्च असलेल्या दिवसांमध्ये कदम यांनी पक्षप्रमुख ठाकरेंना एक नवा धक्का दिला त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये गरमागरम चर्चांना ऊत आला होता. सोमवारी प्रसार माध्यमांमधील प्रतिनिधींनी रामदास कदम यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. मात्र सोमवारी कोणाशीही विशेष संवाद न साधलेल्या कदम यांनी अत्यंत तोलून मापून बोलण्याचं सूत्र अवलंबिले असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.

वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींपासून जाणीवपूर्वक लांब राहिलेल्या रामदास कदम यांनी ‘टाईम महाराष्ट्र’ बरोबर बोलताना सांगितले की, आज तीन वर्षानंतर मला मी एखाद्या बंदीवासातून मुक्त झाल्यासारखं वाटत आहे. लोकांमध्ये जाणाऱ्या आणि लोकांमध्येच आपलं सुख शोधणाऱ्या माझ्यासारख्या नेत्याला गेली तीन वर्ष विनाकारण प्रचंड घुसमटीचा सामना करावा लागला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला संघटनेच्या नेतेपदावर बसवलं होतं. मात्र त्यांच्या पश्चात मला ना धड काम करू दिलं गेलं ना माझ्याकडून माझ्या क्षमतेची कामे करून घेतली गेली. पण आता गेला तो इतिहास आहे. येणाऱ्या भविष्यकाळाबद्दल मी लवकरच बोलेन”. रामदास कदम यांच्या या मोजक्या शब्दातल्या प्रतिक्रियेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर नव्या समस्या उभ्या राहू शकतात याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांची आपल्या गटाच्या नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे दोन ‘भाई’ एकत्र आल्याची चर्चा शिवसेनेत सुरु आहे.

हेही वाचा : 

राशी भविष्य 19 जुलै 2022

Exit mobile version