शरद पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे हे निव्वळ ढोंग, आमदार प्रवीण दरेकर यांची टीका

शरद पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे हे निव्वळ ढोंग, आमदार प्रवीण दरेकर यांची टीका

आगामी विधानसभा निवडणुका आता काहीच महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शहा यांनी गेल्यावर्षीही कुटुंबासोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. मात्र पवारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे हे निव्वळ ढोंग आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

शरद पवार यांनी दिली लालबागच्या राजाला भेट
सोमवारी सकाळी शरद पवार हे त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात यांच्यासोबतीने लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. मात्र त्यांच्या याच कृतीनंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पवारांच्या विरोधात टीका केली आहे.

काय म्हणाले प्रवीण दरेकर ?
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी एका व्हिडीओद्वारे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ” ४० वर्षांनंतर (मध्यंतरी) शरद पवार रायगडावर गेले होते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. आणि आता ३० वर्षांनी पुन्हा त्यांनी जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता पवार साहेबांना रायगडाची, लालबागच्या राजाची आठवण आली. मी लालबागच्या राजाकडे प्रार्थना करतो, की त्यांना हिंदुत्वाबाबतीत सुबुद्धी मिळो.”

व्हिडीओद्वारे प्रवीण दरेकरांची पवारांवर टीका

ज्ञानेश्वर महाराज यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा, विठूरायाचा,हिंदुत्वाचा अपमान केला. मात्र त्यावर शरद पवार काहीच बोलले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले. निवडणुकीच्या दृष्टीने, नौटंकी का होईना, लालबागच्या राजाने त्यांना सद्बुद्धी दिली. पण महाराष्ट्रातील जनतेला त्यांच हे ढोंगी प्रेम, ढोंगी श्रद्धा निश्चितच समजून येईल, असा टोलाही त्यांनी लावला आहे.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

Exit mobile version