…तर त्या आमदारांची नावं सांगा; एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान

आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर ही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

…तर त्या आमदारांची नावं सांगा; एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान

सध्या राज्यात सत्तासंघर्ष सुरु असून अनेक नेते मंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाकडे फक्त्त राज्याचं च नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मागील एका आठवड्यापासून जे सत्ता संघर्ष सुरु आहे ते नेमकं कोणतं वळण घेणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे सर्व सुरु असताना शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी एक मोठे वक्तव्य केले, ”शिंदे गटातील २० आमदार अजूनही आमच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.” यावरून राजकारणात एकच खळबळ उडाली. अनिल देसाई यांच्या या दाव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. यावर नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतीच आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

गुवाहाटी येथील हॉटेल रेडीसन ब्लू मध्ये ५० आमदारांसोबत वास्तव्यास असलेले नेते एकनाथ शिंदे थोड्या वेळापूर्वी हॉटेलच्या आवारात फिरताना दिसले. यावेळी हॉटेल बाहेर असलेल्या प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अनिल देसाई यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी शिंदे यांना आपली प्रतिक्रिया विचारली तेव्हा ”सर्व ५० आमदार या ठिकाणी स्वत:च्या इच्छेने आले आहेत. त्यांना कोणीही जबरदस्ती नाही केली. ते सुरक्षित आहेत. बाळासाहेबांची खरी शिवसेना हीच आहे”, असं शिंदे म्हणाले.

दरम्यान आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर ही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे, ”ठाकरेंनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी कोण आमदार संपर्कात आहेत हे सांगावं. नावं सांगा”, असं शिंदे म्हणाले. राजकीय बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. तसेच आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले असून जेपी नड्डा आणि अमित शाहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुढे काय हालचाली घडतात हे पहावं लागेल.

Exit mobile version