पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पक्ष संपवायला घेतला; मीनाक्षी शिंदे

पक्षाचे नेते अजून किती पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढणार आहेत,असा प्रश्न माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पक्ष संपवायला घेतला; मीनाक्षी शिंदे

महारष्ट्रातील सत्ता संघर्षाला सध्या वेग आला असून अनेक हालचालींना सुरुवात झालेली आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यामुळे ठाकरे सरकार ची उद्या अग्निपरीक्षा असणार आहे. उद्या बहुमत चाचणी पार पडणार आहे. उद्या नेते एकनाथ शिंदे ४० आमदारांसह मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे अनेक सुरक्षा यंत्रणांना राज्यात पाचारण करण्यात आले आहे. एकीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदेंविरुद्ध शिवसेना आक्रम झालेली असताना ठाणे जिल्ह्यातून मात्र अनेकांकडून एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला जात आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेना ठाणे जिल्हा संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे. यावर पक्षाचे नेते अजून किती पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढणार आहेत,असा प्रश्न माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

शिवसेना ठाणे जिल्हा संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हा मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांना सवाल केला, शिवसेनेतून आमची कोणी हकालपट्टी करु शकत नाही, आम्ही शिवसैनिकच आहोत, आमचं पद अशा प्रकारे कोणी काढून घेऊ शकत नाही. तुम्ही अशा प्रकारे सर्वांचीच हकालपट्टी करणार असाल तर शिवसेना शाखेला टाळं लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच पक्ष संपवायला घेतला असून आमची पदे काढून घेतली जात आहेत. तरी आमचे शिवसैनिक पद कुणीच काढून घेऊ शकत नाही, असेही मीनाक्षी शिंदे म्हणाल्या. नरेश म्हस्के यांच्याबरोबरच मिनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचे उघडपणे समर्थन करत जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनेने त्या दोघांची पक्षातून हकालपट्टी केली.

Exit mobile version