Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Ambadas Danve यांच्या निलंबनाविरोधात Shivsena UBT गट आक्रमक

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. सोमवार (१ जुलै) रोजी विधानपरिषदेत झालेल्या गोंधळानंतर अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शिवीगाळ केले होते. काल (मंगळवार, २ जुलै) विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित केले असून निलंबनाच्या काळात विधान भवन (Maharashtra Vidhan Bhavan) परिसरातदेखील येण्यास बंदी घातली आहे. यावर आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच दानवेंचे निलंबन मागे घ्या, अशी मागणी करत शिवसेना उबाठा विधानपरिषदआमदारांनी विधानपरिषदेच्या कामावर बहिष्कार टाकला.

अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावर काल (मंगळवार, २ जुलै) शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. ते म्हणाले, “अंबादास दानवे यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली. त्यांनी जो शब्द वापरला त्याबद्दल मी माता भगिनींची माफी मागतो. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या प्रचारात माता भगिनींचा जो अपमान केला, बहीण भावाच्या नात्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर ते माफी मागणार का? एका भगिनींवर अन्याय केल्यावर आम्ही ज्याला मंत्रिमंडळातून काढलं तो व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात आहे. सुप्रिया सुळे यांना शिव्या घालणारा तुमच्या मंत्रिमंडळात आहे, त्यावर काय बोलणार?”

ते पुढे म्हणाले, “अंबादास दानवे यांचे निलंबन झाले. पण त्यावर चर्चा व्हायला हवी होती. त्यावर एकतर्फी निर्णय झाला. एका कुणाकडून तरी निर्णय झाला आणि तसा निर्णय झाला. अंबादास दानवेंनी माफीची संधी द्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. महाराष्ट्रातील जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. विधानपरिषदेमध्ये आम्हाला मिळालेल्या यशानंतर हि सूडबुद्धीने कारवाया करण्यात आली आहे. राज्यातील मूळ मुद्दे बाजूला ठेवून त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.”

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात व्यक्तव्य करत; “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्र विधानपरिषदेत उमटले प्रसाद लाड यांनी याविरोधात आवाज उठवला असता अंबादास दानवे सोबत त्यांची बाचाबाची झाली आणि याचे पर्यवसन शिवीगाळीत केले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये विधानभवन येथे सुरु आहे.

हे ही वाचा:

राज्यातील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, Deepak Kesarkar यांनी दिली माहिती

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” CM Eknath Shinde यांनी केल्या ‘या’ अटी रद्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss