मुख्यमंत्र्यांना पेढे भरवण्यावरून शिवसेनेनं राज्यपालांवर केली जळजळीत टीका

बऱ्याच नेत्यांनी कालच्या भाषणात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर त्याहून अधिक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने आपल्याला धक्का बसल्याचे उघडपणे बोलून ही दाखवले.

मुख्यमंत्र्यांना पेढे भरवण्यावरून शिवसेनेनं राज्यपालांवर केली जळजळीत टीका

राज्यात शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र येत नवे सरकार स्थापन केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काल विधी मंडळाच्या अध्यक्षपदाची मत मोजणी पार पडली आणि भाजपच्या राहुल नार्वेकर यांचा १६४ मतांनी विजय झाला. अनेक नेत्यांनी सभागृहात राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देणारे भाषण केले. यावेळी बऱ्याच नेत्यांनी कालच्या भाषणात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर त्याहून अधिक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने आपल्याला धक्का बसल्याचे उघडपणे बोलून ही दाखवले.

तर शिवसेनेनं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद राज्यपलांना झाल्याचा दावा शिवसेनेनं केला. तसेच नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पेढे भरवण्यावरुनही शिवसेनेनं टीका केली आहे. भगतसिंह यांना फाशी दिल्यानंतर ब्रिटिशांना जसा आनंद झालेला तसाच आनंद राज्यपालांना ठाकरे सरकार पडल्यानंतर झाल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. तसेच ठाकरे सरकार पडल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही असं सांगतानाच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरही निशाणा साधला आहे.

 

काल विधानसभेच्या नव्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या राहुल नार्वेकर यांच्यावर ही अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे. शिंदे गटातील आमदारांच्या जोरावर भाजपने ही निवडणूक लढवून आणली असल्याची टीका ही सामनातील लेखातून करण्यात आली आहे. विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नार्वेकर पूर्वी शिवसेनेत नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि आता विधिमंडळात पोहोचल्याचे ही या लेखात म्हणण्यात आले आहे. शिवसेना पक्ष फोडून त्यातूनच एखादा विरोधक उभा करून त्यांच्या विरुद्ध निवडणुक लढवून जिंकण्यात आम्हाला तरी काहीच आश्चर्य वाटत नाही असे ही सामनातील लेखात म्हणण्यात आले आहे.

Exit mobile version