नवाब मलिकप्रकरणी सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली

नवाब मलिकप्रकरणी सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला

माजी मंत्री नवाब मलिक सध्या जामिनावर सुटले आहेत. कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आज ते पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसले. तसंच, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हजेरी लावली.
राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. आजही ते सत्ताधारी बाकावर बसतात की विरोधकांच्या बाकावर याची चर्चा रंगली होती. नवाब मलिक विधानसभेत पोहोचताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिकांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं स्पष्ट झालं. यावरून विधान परिषदेत तुफान खडाजंगी झाली. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर टीका केली, त्यानांच तुमच्या सत्तेत सामील करून घेतलं, यावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे आज विधान परिषदेत म्हणाले. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुरुंगात गेल्यानतंरही तुम्ही त्याचं मंत्रिपद काढायला का तयार नव्हता याचं आधी उत्तर द्या. नवाब मलिकांच्या या मुद्दयावरून तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. याचे पडसाद विधानसभेच्या बाहेरही उमटले. तर, सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

“पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपाने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्र फडणवीस भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!”, अशी खोचक टीप्पणी सुषमा अंधार यांनी एक्सवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की जेलमध्ये व्यक्ती असतानाही आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही. ते आता ही भूमिका मांडत आहेत. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आमच्या बाजूला अजित दादा मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला, भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोह्याचा आरोप झाल्यानतंर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा.

हे ही वाचा:

हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपटातील लूक प्रदर्शित

DR. AMBEDKAR यांचा महापरिनिर्वाणाच्या आधीचा दिवस कसा होता?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version