मनसेच्या कामगार सेनेतून सचिन गोळे यांचे निलंबन

कामगारांचा प्रश्नांसाठी अविरत कार्य करत असताना त्यांना सरचिटणीस पदावरुन काही कल्पना न देता काढण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे.

मनसेच्या कामगार सेनेतून सचिन गोळे यांचे निलंबन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची नवनियुक्त २०२२ ची कार्यकारिणी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या नव्या यादीत मनसे कामगार सेनेच्या सरचिटणीस पदी असलेल्या सचिन गोळे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे सचिन गोळे यांचे या पदावरून निलंबन केले असल्याचे समजते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सचिन गोळे यांचे सरचिटणीस पदावरुन निलंबन केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ते अनेक वर्षांपासून कामगारांच्या हक्कासाठी कार्य करत आहेत. सचिन गोळे यांनी महिंद्रा कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले आहे. बेकायदेशीरपणे कामगारांना नोकरीवरून काढले जात असताना मराठी माणसाच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी मनसे कामगार सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह सरचिटणीस सचिन गोळे यांनी आजपर्यंत अनेक महत्वाच्या भूमिका घेतल्या आहेत. कोरोना काळात अनेक कामगारांना नोकरीवरून कमी केले गेले, तेव्हा त्यांच्या हक्कासाठी सचिन गोळे यांनी आवाज उठवला होता. अमेझॉन कंपनीच्या ॲप मधे मराठी भाषेला प्राधान्य मिळवून देण्याचं काम सचिन गोळे यांनी केलं आहे. कामगारांचा प्रश्नांसाठी अविरत कार्य करत असताना त्यांना सरचिटणीस पदावरुन काही कल्पना न देता काढण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे.

यावर आपली प्रतिक्रिया देत मनसे चे सचिन गोळे यांनी सांगितले, नवीन जाहीर झालेला यादीत माझे नाव कुठेच नाही ही गोष्ट मला जेव्हा समजली तेव्हा मला देखील प्रश्न पडला. “याबाबत ठोस कारण अद्याप माझ्यापर्यंत आलेले नाही. पक्षातील अनेक लोकांना माझ्या कामामुळे त्रास होत आहे हे माझ्या लक्षात आले होते. माझ्याकडे अनेक कामगार त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी येत होते याच कारणाने मी पुढे जाईन की काय या भीतीने अनेक जणांनी माझ्या विरुद्ध पक्षात तक्रारी करून हे घडवून आणले आहे अशी शक्यता मला वाटते. बाकी काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहीन आणि माझं काम सुरूच राहील.” असं सचिन गोळे म्हणाले. याबाबत पक्षाकडून अजून कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Exit mobile version