गृहमंत्री अमित शहांना भेटले ठाकरेंचे ‘मावळे’

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी फेसबुक लाईव्ह वरून आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण शिवसेना पक्ष पुरता भांबावून गेला आहे.

गृहमंत्री अमित शहांना भेटले ठाकरेंचे ‘मावळे’

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी फेसबुक लाईव्ह वरून आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण शिवसेना पक्ष पुरता भांबावून गेला आहे. या भांबावलेपणातून वाट काढण्यासाठी ठाकरे पिता पुत्र प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. मात्र त्याच वेळेला रोज नवी माहिती आणि नव्या समस्येची चर्चा समोर येत आहे.

त्यामुळेच कुठे कुठे ठिगळं लावायची असा प्रश्न मातोश्रीला पडला आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत सदिच्छा भेटींचा सिलसिला घडवून आणला. त्यावेळेस शिवसेनेचे दिल्लीतले अकरा मावळे सत्तांतराच्या ‘खऱ्या किमयागारा’ला भेटून आले. आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी उद्धव ठाकरे यांनाच काहीसं खासदारांसमोर झुकायला भाग पाडलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर भाषण करताना तुफान टोलेबाजी केली. या फटकेबाजीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख ‘चट्टान’असा केला. सत्तेचे खरे कलाकार हे माझ्या बाजूला बसले आहेत असं सांगून शेजारी बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कलाकारीला मुख्यमंत्री शिंदेंनी सलाम करत दाद दिली. त्याच कलाकार उपमुख्यमंत्री फडणवीस यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीचा सदिच्छा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या चार बड्या नेत्यांच्या भेटी पैकी सर्वाधिक दीर्घ भेट ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर होती. सुमारे चार तास या तीन नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

गृहमंत्री अमित शहा हे कृष्णा मेनन या निवासस्थानात राहतात. या निवासस्थानाला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे मेनन रोडवर आहे तर या निवासस्थानाला एक मागील प्रवेशद्वार देखील आहे. तसेच एक मधले प्रवेशद्वार देखील आहे. याच मागच्या प्रवेशद्वारातून शिवसेनेचे एकूण ११ खासदार गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या खासदारांबरोबर गृहमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली.कोणत्या खासदारांनी कोणत्या मुद्द्यावर कधी आणि कसं पत्र द्यायचं आणि पक्षप्रमुख ठाकरे यांना कोंडीत पकडायचे यासंदर्भातली चर्चा या ठिकाणी करण्यात आली.

हेही वाचा : 

धनंजय मुंडे यांचा जिम मधील वर्कआउट करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना ५ जून रोजी पत्र लिहिले आहे. सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाने या खासदारांनीही राहुल शेवाळे यांच्या हो मध्ये हो मिळवलेला आहे. शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांना भाजपबरोबर जाण्यासाठी गळ घातली आहे. शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर शिवसेना खासदार आक्रमकपणे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांच्या पाठिंबासाठी आग्रह धरत आहेत.

एकसंघपणे पक्षाच्या खासदारांनी केलेल्या मागणी समोर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही नाईलाज होताना दिसत आहे. त्यामुळे १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी सेनेच्या एका तरुण आणि उच्चशिक्षित खासदाराने व्यूहरचना केल्याची खात्रीलायक माहिती आहे. अमित शहा यांच्याकडे ११ खासदारांना घेऊन जाणारा खासदार शिंदेचा खास समजला जातो. त्यामुळे लवकरच मातोश्री या खासदारांच्या दबावा समोर झुकत एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रोपदी मुरमु यांना मतदान करतील अशी मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

सगळे खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत – अनिल देसाई, खासदार

Exit mobile version