ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार ?

दोन वर्षे कोविडच्या महामारीमुळे होऊ न शकलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह राजकारण्यांपासून ते बॅालिवूडकरांपर्यंत ओसंडून वाहतोय.

ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार ?

दोन वर्षे कोविडच्या महामारीमुळे होऊ न शकलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह राजकारण्यांपासून ते बॅालिवूडकरांपर्यंत ओसंडून वाहतोय. अश्यातच कोविडमुळे सगळ्यांनाच जाचक अटींमध्ये जखडून टाकणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खाजगी सचिव आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरच्या गणपतीसाठी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची रीघ लागली होती. सध्या सेनेत अस्वस्थतेचे वातावरण असताना मिलिंद नार्वेकर हे शक्तिप्रदर्शन करतायत की आपल्या निराशेला आशेचा किरण शोधतात याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे . फडणवीस- शिंदे यांच्याशी नार्वेकरांचे खास मेतकूट असल्यामुळे मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात जाणार अश्या चर्चांनाही सध्या उधाण आले आहे.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरचा दीड दिवसांचा गणपती मुंबईतला एक सेलिब्रिटी गणपती समजला जातो. राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांसह , राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच बॅालिवूड स्टार्स आणि बडे व्यावसायिक यांची आवर्जून उपस्थिती नार्वेकरांच्या घरच्या गणेश दर्शनासाठी असते. अत्यंत महागड्या विदेशी फुलांची सजावट, दिव्यांची आरास या गणपतीसाठी करण्यात येते. यंदा मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक असल्यामुळे दरवर्षी दिसणार बाप्पांचा ग्लॅमरस लूक यंदा अनुभवता आला नाही. त्यातच २९ जूनला मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात उभी फूट पाडत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेत. तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यातच दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकल्याने सेनेत काहीच आलबेल नाही. २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे विराजमान होताच त्यांनी खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांचे महत्व लक्षणीयरित्या कमी केले होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी २९ वर्षे सावलीसारखे वावरणारे मिलिंद नार्वेकर यांच्याऐवजी ठाकरेंनी प्रशासकीय अधिकारी, आमदार अनिल परब आणि युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनाच महत्व द्यायला सुरूवात केली होती. पक्षातील महत्व घटल्यात्मुळे मिलिंद नार्वेकर नाराज आहेत. आदित्य ठाकरेंनाही मिलिंद नार्वेकरांपेक्षा युवासेनेवर अधिक विश्वास आहे. त्यामुळेही नार्वेकर अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस यांच्याशी नार्वेकर यांच्याशी अत्यंत घट्ट मैत्री आहे. त्याच मैत्रीला जागत गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं. त्याआधी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीही नार्वेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यावर नार्वेकर-शिंदे या उभय नेत्यांत एका बंद खोलीत ४० मिनिटं चर्चा केली. या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मुख्यमंत्री घरात असताना वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरांनाही त्यांच्या घरची दृश्ये टिपू दिली नाहीत. आशिष शेलार यांनीही नार्वेकर यांच्याशी स्वंतत्रपणे चर्चा केली.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या यादीत नाव असावं अशी मिलिंद नार्वेकर यांची इच्छा आहे. महाविकास आघाडी सरकार असताना बनलेल्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते खूपच नाराज होते. अश्यातच त्यांच्या घरी भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री शिंदेनी भेट दिल्यामुळे आणि दीर्घ बैठका केल्याने मिलिंद नार्वेकर शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात.

यावर प्रतिक्रिया विचारण्यासाठी शिवसेनेतील काही नेत्यांना फोन केला असता, नार्वेकर हे पक्षप्रमुखांचे पीए आहेत. त्यावर पक्षप्रमुखच बोलतील असं सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मिलिंद नार्वेकर माझे मित्र आहेत. मी दरवर्षी त्यांच्या घरच्या गणपतीला जातो. धर्मवीर आनंद दिघेही त्यांच्या घरी गणपतीला जायचे. मी मुख्यमंत्री असलो तरी मैत्री विसरणार नाही. माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या आईच्या निधनामुळे यंदा त्यांनी कोणालाच आमंत्रण दिले नव्हते तरी मी गेलो होतो. हे फक्त मैत्रीतच घडते ना?

मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत असल्याचा निरोप त्यांच्या कार्यालयातून देण्यात आला.

हे ही वाचा:

लखनौ येथील हॉटेलमध्ये अग्नितांडव

आज शिक्षकदिन जाणून घेऊया… डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version