महाविकास आघाडीतील नेत्यांचा मेंदू गुडघ्यात,मनसेचा हल्लाबोल

कोरोना काळातील कामे सोडून इतर कामावरील खर्चाचे ऑडिट सुरू ठेवावे, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडीतील नेत्यांचा मेंदू गुडघ्यात,मनसेचा हल्लाबोल

सध्या मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत झालेल्या कामाची कॅग चौकशी सुरु आहे. त्यामध्ये कोरोनाकाळातील खर्च वगळता इतर खर्चाची चौकशी होणार आहे. काही दिवसांपूर्वी गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारने विनंती केली होती. राज्य सरकारची ही विनंती ‘कॅग’ ने मान्य केल्यानंतर कॅग टीम आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. महापालिकेतील कोरोना केंद्र उभारण्यातील गैरव्यवहार, कोरोनाच्या नावाखाली केलेली वारेमाप खरेदी, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना कंत्राट देणं, दहीसर येथील जमीन खरेदी प्रकरण, रस्ते बांधणी अशा सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कामांचे ‘कॅग’च्या माध्यमातून लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील महिन्यात घेतला होता. याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी देखील मान्यता दिली होती. मात्र, यामध्ये साथरोग अधिनियम (pandemic act) कायद्यातील तरतुदीनुसार कोरोना कामाच्या टेंडरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नसल्याने कोरोनाकाळातील कामांची चौकशी करणे कॅग अधिकाऱ्यांना अवघड जात आहे. त्यामुळे कोरोना कामे सोडून इतर कामांची चौकशी, ऑडिट कॅग अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. बीएमसी निवडणूक आणि राज्याचा अर्थ संकल्प सादर होण्याआधी कॅग आपला रिपोर्ट सादर करणार असून कोरोना काळातील कोरोनासंबंधी झालेल्या कामाच्या चौकशीसंदर्भात राज्य सरकार विधी व न्याय विभागाचा सल्ला घेत आहे. मात्र, तोपर्यंत कोरोना काळातील कामे सोडून इतर कामावरील खर्चाचे ऑडिट सुरू ठेवावे, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान,बीएमसीतील सर्व कामांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस, भाजप ,मनसेने केली आहे. तसेच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, कॅगची चौकशी केल्यावर जो दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई झाली नाही तर मनसे आपल्या पद्धतीने शिक्षा देईल, भर रस्त्यात दोषीला चोप दिला जाईल, असा इशारा देखील या वेळी त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर मुंबईसोबतच ठाणे, पुणे, नागपूर पालिकांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच कोरोनाकाळातील टेंडरबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर देखील टीका केली आहे. यावेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले,”एखाद्या कामाची चौकशी का होऊ शकत नाही? तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरता कशाला? पालिका आयुक्तांमध्ये एवढी हिंमत कशी येते? भ्रष्टाचार झाला असेल तरी कारवाई करू नका, असा कोणता कायदा आहे?”, असे प्रश्न संदीप देशपांडेंनी केले आहेत. यापुढे देशपांडे म्हणाले,”मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल खोटं बोलत आहेत. आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित लोकांना काम कशी मिळाली? इक्बालसिंह चहल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कामं केली जात होती”, असा आरोप देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे.

त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यावर देखील खोचक टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले,”महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात आहे. आघाडीचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत तर त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

Bigg Boss Marathi 4 चा महाअंतिम सोहळा दणक्यात पडला पार, ‘या’ अभिनेत्याचा झाला विजय

Tirupati मंदिरात दर्शनासाठी भाविकांना विशेष पास सेवा सुरू

राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात, मनसेच्या बड्या नेत्याचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version