Wednesday, October 2, 2024

Latest Posts

पाया पडतो पण… दूध संघातील भ्रष्टाचार प्रकरणी खडसेंचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

राज्यात पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून त्याचाच प्रत्यय म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे अशा काही गोष्टी समोर येत आहेत.

जिल्हा दूध उत्पादक संघातील लोणी (बटर) आणि दूध भुकटीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी शहर पोलीस ठाणे गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार खडसेंनी दूध संघातील विक्रीतील अपहार प्रकरणी अध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या मांडणार असल्याचा पवित्रा घेतला. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात समर्थकांसह ठिय्या दिला.

चार तास उलटूनही गुन्हा दाखल होत नसल्याने एकनाथ खडसे यांनी चक्क हात जोडून अधिकाऱ्याला उद्देशून मी तुमच्या पाया पडतो गुन्हा दाखल करा अशी विनंती केली.
जिल्हा दूध संघातील एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी खडसे तब्बल चार तासांपासून जळगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या दालनात या आंदोलनाला बसले आहे.

शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी आमदार खडसेंसह दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, दीपक फालक, वाल्मीक पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार खडसे यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना चांगलेच धारेवर धरले. आधी साध्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असला, तरी आता आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. दूध संघातील विक्रीतील गैरव्यवहार प्रकरणी वेळीच गुन्हा दाखल करण्यात न आल्यामुळे दोन्ही संशयित फरार झाले असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.

राज्यात पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून त्याचाच प्रत्यय म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे अशा काही गोष्टी समोर येत आहेत. जिल्ह्यात सट्टा, पत्ता तसेच अवैध धंदेही मोठ्या प्रमाणावर वाढले असून पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे या गोष्टी घडत असल्याचा आरोप ही यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच साधा गुन्हा दाखल करण्यासाठी आमच्या सारख्या नेत्यांना यावे लागते अशी खंतही यावेळी खडसेंनी व्यक्त केली. तसेच जोपर्यंत या प्रकरणात नियमानुसार कायद्यानुसार तक्रार अथवा गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही असा आक्रमक पवित्र एकनाथ खडसेंनी घेतला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. तर दुसरीकडे कायदेशीर बाबीचे कारण पुढे करत पोलिस अधिकारी त्यांची समजूत घालत आहेत. तसेच चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र एकनाथ खडसे मात्र त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मी आज मेलो तरी गुन्हा दाखल केल्याशिवाय जाणार नाही असेही एकनाथ खडसे यांनी ठणकावून पोलिसांना सांगितले.ब्लड प्रेशरचा त्रास तसेच मधुमेह असल्याने, प्रकृती लक्षात घेता पोलिस स्टेशनमध्येच डॉक्टरांना बोलावून एकनाथ खडसे यांची जागीच तपासणी करण्यात आली.

हे ही वाचा:

छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गैरहजर, अजित पवारांनी लगावला टोला, म्हणाले…

Wardha Elections : वर्धा जिल्ह्यात थेट जनतेतून सरपंचाची निवड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss