तुपकरांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या जलसमाधी आंदोलनला तूर्तास स्थगित

तुपकरांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या जलसमाधी आंदोलनला तूर्तास स्थगित

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आपलं जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक होती अशी माहिती रविकांत तुपकर यानी दिली. शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं ते म्हणाले. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी रविकांत तुपकर हे आज अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार होते.

रविकांत तुपकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बऱ्याचशा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ज्या मागण्या आता मान्य करण्यात आल्या नाहीत त्यासाठी थोडा वेळ लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. बऱ्यापैकी आमचं समाधान झाल्यानं आम्ही आज होणारं हे आंदोलन मागे घेत आहोत. पण राज्य सरकारने जर शब्द फिरवला तर मात्र पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसलं जाईल. काही निर्णयांच्या मागण्यासंबंधी एक शिष्टमंडळ केंद्र सरकारला जाऊन भेटणार असल्याचं ते म्हणाले. कृषी कर्जाला सीबिलची अट लावली आहे, ती अट महाराष्ट्रात लावण्यात येणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आज अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार होते. त्यासाठी ते शेकडो शेतकऱ्यांसह मुंबईला आले होते. रविकांत तुपकर यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात कार्यकर्ते जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५७ कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु जाहीर झालेली मदत ही तुटपूंजी असून आपण जलसमाधीवर ठाम असल्याचं तुपकरांनी म्हंटलं होतं.

हे ही वाचा : 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत; देवेंद्र फडणवीस

Indian Science Congress : नागपुरात ४९ वर्षांनंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे आयोजन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version