spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सध्याचं राजकारण हे कॉलेजमधील तरुण-तरुणी एकमेकांना जशा शिव्या घालतात, तसं झालंय; अभिजीत बिचुकले

 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानं महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. शिवसेनेत नेमक्या कोणत्या कारणातून बंडखोरी झाली? याबाबत अनेक राजकीय नेत्यांकडून तर्क-वितर्क लावले आहेत. मात्र, प्रत्येकांच्या दाव्यात कमी अधिक प्रमाणात मत भिन्नता आहे. असं असताना शिवसेना नेमकी कशी फुटली? याबाबत ‘बिग बॉस’ फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी अजब दावा केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना बिचुकले म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं, तेव्हा आतल्या खोलीत उद्धव ठाकरेंना असं सांगण्यात आलं होतं की, अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद सोडा आणि शरद पवार सांगतील त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा. त्यामुळे बरोबर अडीच वर्षानंतर शिवसेना फुटली. बरोबर अडीच वर्षांनीच जर शिवसेना फुटली असेल, तर यामागे कुणीतरी मास्टरमाइंड आहे, असं मला वाटतं. पण ती व्यक्ती कोण आहे? हे मला माहीत नाही. मागील तीन-चार महिन्यांपासून एकमेकांचे आई-बहीण काढणारेच अंधेरी पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, शरद पवारांना नेस्तनाबूत करण्यासाठी झालेला हा कुटील कट आहे. जेव्हा शरद पवारांचा मुख्यमंत्री करायची वेळ आली, त्याचवेळी शिवसेना फुटली. शिवसेना हा नवरा आहे आणि भाजपा ही बायको आहे. त्यांचा अतिशय सुंदर संसार चालला होता. दोघांनी बहुतेक एक नाट्य केलं आहे. अडीच वर्षांच्या बोलणीप्रमाणे शरद पवारांचा मुख्यमंत्री होऊ नये, म्हणूनच हे घडलं आहे”, असा अजब दावा अभिजीत बिचुकलेंनी केला आहे.

सध्याचं राजकारण हे कॉलेजमधील तरुण-तरुणी एकमेकांना जशा शिव्या घालतात, तसं झालंय. सध्या राजकारणात असलेले सगळे नेते हे साठ वर्षांच्या पुढचे आहेत. या लोकांना जनतेचं काही देणं-घेणं नाही. त्यांना फक्त त्यांच्या मुलांसाठी कमवायचं आहे. त्यांची पोरं काय करतात, हे सांगायची गरज नाही. सातारा नगर पालिकेमध्ये आपण लक्ष घालणार असल्याचंही बिचुकले यांनी यावेळी सांगितलं. ”सर्वसामान्यांच्या नावावर आतापर्यंत नेत्यांनी पोटं भरली. परंतु मी एकटा आहे, ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही. त्यामुळे जनतेने मी सांगेन तो उमेदवार निवडून द्यावा. या सगळ्यांनाच आता घरी बसवा. कारण या नेत्यांचे एकमेकांशी नातेसंबंध आहेत.” अशा शब्दांमध्ये बिचुकले यांनी पुण्यात बोलतांना भावना व्यक्त केल्या.

हे ही वाचा :

भारत जोडो यात्रा ७ नाव्हेंबरला महाराष्ट्रात; काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

‘आनंदाचा शिधा’ आदेश का आश्वासन ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss