उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (शुक्रवार, ६ सप्टेंबर) आपल्या ‘X’ अकाऊंटवरून मोठी बातमी देत संपूर्ण देशात महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीत पाहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अभिनंदन महाराष्ट्र म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट शेअर केली आहे. यावरून आता विरोधकांनी फडणवीसांवर निशाण साधला आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यावर मोठी प्रतिक्रिया देत, देवेंद्र फडणवीसांनी केलेला दावा बोगस असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर निशाणा साधत विजय वडेट्टीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते यावेळी म्हणाले, “ते म्हणालेत कि परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. फडणवीसांचा हा दावा बोगस आहे. खर म्हणजे फडणवीसांनी गुजरातलाअ महाराष्ट्रापुढे नेऊन ठेवले आहे.” असे ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत एक नंबर, फडणवीसांचा दावा
अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी !! देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!!
गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. कर्नाटक (19,059 कोटी), दिल्ली (10,788 कोटी), तेलंगणा (9023 कोटी), गुजरात (8508 कोटी), तामिळनाडू (8325 कोटी), हरयाणा (5818 कोटी), उत्तरप्रदेश (370 कोटी), राजस्थान (311 कोटी) या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी 2022-23 : 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) 2023-24 : 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक)
राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे…
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge