ठाकरे गटाला शिवतीर्थ देऊ नका, अशी मागणी आम्ही केली नव्हती – गुलाबराव पाटील

ठाकरे गटाला शिवतीर्थ देऊ नका, अशी मागणी आम्ही केली नव्हती – गुलाबराव पाटील

शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने पहिली न्यायालयीन लढाई जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली आहे.

गुलाबराव पाटील जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केलं. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळवून शिवसेनेनं पहिली न्यायालयीन लढाई जिंकली आहे, याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, याला लढाई म्हणण्यासारखं काय आहे? यामध्ये त्यांना न्याय मिळाला आहे. न्यायालयीन लढाईबाबत गुलाबराव पाटलांनी पुढे सांगितलं की, शिवाजी पार्क आम्हाला मिळावं, यासाठी शिवसेना पक्ष न्यायालयात गेला नव्हता. तिथला एक स्थानिक आमदार न्यायालयात गेला होता. ठाकरे गटाला शिवतीर्थ देऊ नका, अशी मागणी आम्ही केली नव्हती. तिथे त्यांची सभा झालीच पाहिजे, फक्त तेथून सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका, एवढीच अपेक्षा असल्याचे यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांची सभा शिवाजी पार्कवर झाली पाहिजे, असं न्यायालयाने म्हटलं असेल तर सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे. आम्हीही मान्य केलंय. आम्ही आमची बीकेसीमध्ये तयारी सुरू केली आहे. त्यामुळे फार मोठी लढाई जिंकलो, असं म्हणण्याची काही गरज नाही. ही केवळ तीन तासांची सभा आहे. दसरा मेळाव्यासाठी कुणाकडे जास्त लोकं येतात, यावर सगळ्यांचं लक्ष आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

हे ही वाचा:

प्रवाशांसाठी खुशखबर सणासुदीच्या निमित्ताने मध्य रेल्वे सोडणार ८२ स्पेशल ट्रेन

मैने पायल है छनकाईच्या रिमेकसाठी फाल्गुनी पाठकने नेहा कक्करला फटकारले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version