अन्याय होत असेल तर शिवसेनेत स्वागत आहे, पंकजा मुंडे यांना ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर

भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन सुनील शिंदे यांनी केलं आहे. आता ठाकरे गटाच्या या ऑफरला पंकजा मुंडे काय प्रतिसाद देतात?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अन्याय होत असेल तर शिवसेनेत स्वागत आहे, पंकजा मुंडे यांना ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर

महाराष्ट्रातील नेत्यांचं सध्या नाराजी सत्र सुरु आहे. त्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत असतात. त्याचबरोबर पंकजा यांनीही अनेकवेळा पक्षाच्या नेत्यांवर टीका करून आपली नाराजी व्यक्त करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी थेट ही ऑफर पंकजा यांना दिली आहे. भाजपमध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन सुनील शिंदे यांनी केलं आहे. आता ठाकरे गटाच्या या ऑफरला पंकजा मुंडे काय प्रतिसाद देतात?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

आमदार सुनील शिंदे पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाथर्डी येथील शिवसेनेच्या शाखेचंही उद्घाटन केलं. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटना बांधणीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,”भाजप नेत्या पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्षही मोठा आहे. त्यामुळे त्यांनी काय मत व्यक्त केलं, त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही,” असं सुनील शिंदे यांनी स्पष्ट केलं.

पंकजा मुंडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय, हे आपण सर्वच ते पाहत आहोत. अर्थात ही त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. पण जर त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांना जर शिवसेनेत यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू,” असं म्हणत शिंदेंनी पंकजांना आवाहन केलं आहे.

यापुढे त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. शिंदे म्हणाले,”देश हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. तपास यंत्रणा केंद्राच्या दबावाखाली काम करत आहेत. फक्त विरोधकांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमध्ये गेल्यावर सर्व पापं धुतली जातात, हे यावरून काय ते कळून येतं,” अशी टीका त्यांनी वेळी केली.

तसेच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर देखील भाष्य सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली. ते म्हणाले,”सरवणकर यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी गोळीबार करून कायदा आणि सुव्यवस्थेला तेव्हा आव्हान दिलं होतं, हे आता स्पष्ट झालं आहे. गृहमंत्र्यांनी आता त्यांच्यावर कारवाई करावी,” असं सुनील शिंदेंनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी याविषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली. यावेळी शिंदे म्हणाले,”राज्याचे गृहमंत्री वारंवर कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत असतात. कुणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही, असं सांगत असतात. आता कर्तव्य पाळण्याची वेळ आली आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर करू नये ही मुंबईकराची इच्छा आहे,” अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

हे ही वाचा:

राशी भविष्य, १३ जानेवारी २०२३, “या” राशीच्या लोकांच्या परिचित लोकांमुळे…

मुंग्यांच्या चटणीपेक्षा विचित्र पदार्थ खाल्ले जातात भारताच्या ‘या’ भागात, नावं वाचून व्हाल आश्चर्यचकित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version