spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘… आरोप खोटे ठरल्यास काय कराल, पत्राचाळ घोटाळा आरोपांवर शरद पवारांचं स्पष्टीकरण

सध्या चर्चेत असलेल्या पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं .

सध्या चर्चेत असलेल्या पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच नाव अतुल भातखळकर यांनी घेतलं होतं . यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास काय कराल असा सवाल राज्य सरकारला शरद पवार यांनी केला आहे. तसेच भाजप सरकर काळात देशातील नागरिकांसमोरील प्रश्न बाजूला ठेवून अन्य पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका पवार यांनी केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यात अटक केली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून भाजपने शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होत असलेल्या आरोपांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, शरद पवार यांनी १४ जानेवारी २००६ रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असतो. तेच या प्रकरणात झाले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. या प्रकरणी चौकशी करावी. त्याला आमचा विरोध नाही. पण, भाजपकडून पराचा कावळा करण्यात येत आहे असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

तसेच वेदांता प्रकल्प गुजरातला गेला, यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात प्रकल्प झाला असता तर मला आनंद झाला असता. त्यासाठी जागाही ठरली होती. नव्या लोकांना काम करण्याची संधी मिळाली असती. देशात कुठे तरी होतोय… राज्य सरकारने गुंतवणुकीचं वातावरण निर्माण केलं असतं तर बरं झालं असतं… मी काम करत होतो तेव्हा मला गुंतवणूक करायला येणाऱ्या लोकांना आणि त्यांना विश्वास देण्यासाठी दोन तास काढावे लागायचे. आज गुंतवणूकदारांना धक्का बसला असेल. सर्वांनी राज्याच्या हितासाठी गुंतवणुकीचं वातावरण तयार करायला हातभार लावावा.

पुढे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला जास्त यश मिळाल्याचा दावा केला जातोय. मात्र हे दावे खोडून काढताना शरद पवार म्हणाले, ‘ १७३ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस तर ८४ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय झालाय. एकूण ग्रामपंचायतींपैकी 285 मविआला तर शिंदे गट आणि भाजपला २१० जागा मिळाल्या आहेत.

भाजपचे आरोप काय?

पत्राचाळ घोटाळा नवीन खुलासे होत असतानाच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी काल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. अतुल भातखळकर यांनी ही मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते, असेही भातखळकर यांनी म्हटलं होतं. याबाबत पत्र लिहून पत्राचाळ घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भातखळकर यांनी केली होती.

तसेच अतुल भातखळकर यांनी यासंबधी एक ट्वीट देखील केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी व्हावी, ED च्या आरोपपत्रात हे नाव आहे. One and only one शरद पवार. याप्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी काल केलं होतं .

हे ही वाचा:

Raju Srivastava : विनोदाचा बादशहा हरपला, राजू श्रीवास्तवबद्दल काही खास किस्से…

Raju Shrivastava : प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss